गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदी भयपट अशा भिन्न शैली आणि प्रकृतीच्या मराठी चित्रपटांना यश मिळते आहे. मात्र, २०२६ या वर्षांच्या सुरूवातीपासूनच उत्पन्नाच्या बाबतीत यशाची चव चाखणार्या मराठी चित्रपटांनी सहा महिन्यांतच २०० कोटी रुपयांपलीकडे झेप घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘देऊळबंद २’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून दोन आठवड्यांत ६०.५० कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटांच्या यशात भर घातली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठीतील उत्तम कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाने ३२ कोटींची कमाई करत नव्या वर्षाची उत्तम सुरुवात करून दिली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाने १० कोटी रुपयांची कमाई केली. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डुपर’ या समीर आशा पाटील दिग्दर्शित चित्रपटाने ३.८५ कोटी रुपयांची कमाई केली.
जानेवारीपासून सुरु झालेल्या या यशस्वी वाटचालीची कमान मे महिन्यात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला मिळालेल्या दमदार यशामुळे आणखी उंचावली गेली. मराठी आणि हिंदीतील नावाजलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांची शौर्यगाथा रंगवणार्या या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने आत्तापावेतो १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मे महिन्यातच प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळबंद २’ या चित्रपटाने या यशावर कळस चढवला आहे. प्रदर्शित झाल्यापासून दोनच आठवड्यांत या चित्रपटाने ६०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गेल्या सहा महिन्यांत मराठीत एकूण ३२ चित्रपट प्रदर्शित झाले असून या सगळ्या चित्रपटांच्या एकूण कमाईचा आकडा २०० कोटी रुपयांपार गेला आहे.
‘देऊळबंद २’च्या चमूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक ‘देऊळबंद २’ चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्यासह अन्य कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांच्या चमूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला राज्यभरातून मिळणार्या उदंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत संपूर्ण चमूचे मनापासून कौतुक केले.
