‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आज घराघरांत महाराष्ट्राचे भावोजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं. नाटक असो किंवा मालिका प्रत्येक माध्यमांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाची घडी व्यवस्थित सांभाळून पुढे ते समाजकारणात सक्रिय झाले. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बांदेकरांनी ठाकरे कुटुंबीयांबरोबर आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
राजकारणातील खास मित्रांबद्दल विचारलं असता आदेश बांदेकर म्हणाले, “मी राजकारण म्हणणार नाही…मी समाजकारण म्हणेन. कारण, माझं बालपण लालबागच्या अभ्युदयनगरमधील असल्याने वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पहिल्यापासून माझ्यावर खूप प्रभाव होता. माझा जन्म १९६६ चा आहे आणि त्याचवर्षी शिवसेनेची स्थापना झाली होती. लालबागमध्ये शिवसेनेचा सुरू झालेला प्रवास बघत आम्ही मोठे झालो आहोत. ते संस्कार, भगव्याचं आकर्षण, वंदनीय बाळासाहेबांचं भाषण, दसरा मेळाव्याला ढोल वाजवत जाणं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी लार्जर दॅन लाइफ होत्या.”
हेही वाचा : Video : रोमँटिक डेट, गेटवे ऑफ इंडियाला सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरची पती हिमांशूसाठी खास पोस्ट
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “दसऱ्या मेळाव्यात शेवटच्या कठड्यावर बसणारा एक शिवसैनिक जेव्हा साहेबांबरोबर स्टेजवर जातो हा संपूर्ण प्रवास होम मिनिस्टरमुळे सुखकर झाला. उद्धव ठाकरेंच्या रुपात माणूसपण जपलेला माणूस मला भेटला. रश्मी वहिनी, आदित्य, तेजस या सगळ्यांमुळे तुमच्या-आमच्यासारखं एक कुटुंब मला जोडता आलं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”
निवडणुकीची आठवण सांगताना अभिनेते म्हणाले, “२००९ मध्ये निवडणुकीला अवघे १३ दिवस बाकी राहिलेले असताना राजकीय परिस्थितीमुळे मी अचानक निवडणुकीला उभा राहिलो. खरंतर निकाल माझ्या विरुद्ध लागला आणि तेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्यावेळी दोन-चार महिन्यांनी मला मोठ्या साहेबांनी बोलावलं. ते म्हणाले होते, ‘आदेश तुला जे पाहिजे ते सांग, काय पाहिजे ते माग. मी सगळं तातडीने करायला तयार आहे. फक्त एक वचन दे तुझ्या चेहऱ्यावरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस.’ त्यांचं बोलणं ऐकून मी म्हणालो होतो, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आज कलाक्षेत्रात काम करत असल्याने मेहनत करणं हे माझ्या स्वभावात आहे. मी यापुढे हसत राहणार आणि लोकांना हसवत राहणार.”
“पुढे, हेच माणूसपण मी उद्धव ठाकरेंमध्ये पाहिलं. त्यांना मी आजवर एवढ्यावेळा भेटलो आहे की, कोणाचं तरी वाईट व्हावं हे मी साहेबांकडून कधीच ऐकलं नाही. ते गप्प राहतील पण, कोणाचं वाईट व्हावं असं कधीच बोलणार नाहीत. आदित्य, तेजस, रश्मी वहिनी कोणीही असं वाईट बोलणार नाही. त्या कुटुंबाला मी फार जवळून पाहिलंय. कधीच कोणाचं वाईट न करता आनंद दिला पाहिजे म्हणून कामाच्या रुपात ही माझी आनंदयात्रा गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि मी कायम काम करत राहणार.” असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.