Loksatta Digital Adda : आजोबा आणि नातू यांच्यातील नातं हे प्रेम, विश्वास आणि निरपेक्ष मायेने विणलेलं असतं. ‘आदि अनंत’मधून अशाच जिव्हाळ्याच्या नात्याचं भावविश्व उलगडणार आहे. या चित्रपटातील कथा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी, बालपणीच्या आठवणींशी आणि आपुलकीच्या माणसांशी पुन्हा एकदा जोडणारी ठरणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्ड्या’ला उपस्थिती लावली होती. त्यांनी सिनेमाच्या शूटिंगचे किस्से, आजोबा-मुलाचं नातं याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
घरातील ज्येष्ठ व्यक्ती अर्थात आजोबा म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा असतो. त्यांच्या सहवासातून मिळणारी शिकवण, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणारी माया आणि प्रत्येक प्रसंगी पाठीशी उभं राहण्याची भावना नात्यांना वेगळीच उब देतात. ‘आदि अनंत’मधून अशाच जिव्हाळ्याच्या नात्याचं भावविश्व उलगडणार आहे. या चित्रपटातील कथा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी, बालपणीच्या आठवणींशी आणि आपुलकीच्या माणसांशी पुन्हा एकदा जोडणारी ठरणार आहे.
दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा आणि नातू यांच्यातील नातं हे प्रेम, विश्वास आणि निरपेक्ष मायेने विणलेलं असतं. या नात्यात निरागस हट्ट असतात, छोट्या-मोठ्या कुरबुरी असतात, तर कधी आयुष्यभर पुरेल असा भावनिक आधारही असतो. ‘आदि अनंत’मधून हे नातं सहज, सुंदर आणि भावनिक रूपात मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. या चित्रपटातील प्रसंग पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू यावं, मनात जुन्या आठवणी जाग्या व्हाव्यात आणि आपल्या माणसांचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवावं, अशी माझी इच्छा आहे.”
