Aali Mothi Shahani Teaser out: हृता दुर्गुळे लवकरच एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्याबरोबर सारंग साठ्ये, ऋजुता देशमुख आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘आली मोठी शहाणी’ असे या सिनेमाचे नाव आहे. काल(३१ ऑगस्ट २०२६)ला सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

“उपवास करू की इथे डोकं आपटून घेऊ?”

आता सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरच्या सुरुवातीला घंटा वाजते. एक लहान मुलगी गणपतीच्या मूर्तीसमोर जाते आणि त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करत म्हणते, “हाय! फ्रेंड्स?” पुढे पाहायला मिळते की ती मुलगी वेगळ्या गणपतीच्या मूर्तीसमोर जाते आणि त्याला खडसावून सांगते, “मी तुला लहान मुलांसारखं बालगणेशाला माय फ्रेंड गणेशा वगैरे काही म्हणणार नाही, कारण मी लहान नाही. माझं लहानपण सगळं जगून झालंय. तुला माहितेय, मोठं झाल्यानंतर काय काय आणि कसं कसं करायचं, हे सगळं माझं ठरलेलं आहे. तुला मला मोठं करावचं लागेल. काय करू म्हणजे तू मला मोठं करशील? उपवास करू की इथे डोकं आपटून घेऊ? तुझं स्तोत्र म्हणत प्रदक्षिणा घालते.”

ती मुलगी प्रदक्षिणा घालत असताना अचानक अंधार दिसतो. जेव्हा ती लहान मुलगी गणपतीच्या मूर्तीबरोबर बोलत असते, त्याचदरम्यान हृता दुर्गुळेची झलक पाहायला मिळते. ती विविध गोष्टी करताना दिसते.

टीझरमध्ये पुढे पाहायला मिळते की, हृता पारंपरिक वेशभूषेत तयार झाली आहे. ती सुंदर साडी नेसली आहे. नाकात नथ घातली आहे आणि ती हसताना दिसत आहे. त्याचवेळी आली मोठी शहाणी असा आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर सारंग साठ्ये मोठ्याने व विचित्र पद्धतीने हसत असल्याचे दिसत आहे.

हा टीझर शेअर करताना लिहिले आहे, “काही स्वप्नं आपण लहानपणी पाहतो, पण ती पूर्ण झाल्याचा अनुभव मात्र आपल्याला मोठेपणी येतो…!”

लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची कल्पना ही अगदी साध्या आणि निरागस इच्छेतून पुढे जाते. लहानपणी मोठं व्हावंसं वाटतं आणि एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून देवाकडे मागणं मागतो, या भावनेत एक वेगळीच गंमत आहे. त्यातून पुढे काय घडतं आणि त्या इच्छेचे काय परिणाम होतात, हे या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने मांडलं आहे.”

निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे या म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट ऐकतानाच तिच्यातला गोडवा आणि गंमत आम्हाला भावली. एका छोट्या मुलीची इच्छा जर खरंच पूर्ण झाली तर त्यानंतर काय काय घडू शकते, ही कल्पनाच खूप मजेशीर आहे. टीझरमध्ये आम्ही कथेचा एक छोटासा भाग दाखवला आहे. हृता – सारंगच्या व्यक्तिरेखांमधून ही गोष्ट आणखी रंगतदार होते. या कथेत पुढे काय होतं हे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर ठरेल.”

फाईन ब्रू प्रोडक्शन आणि जयकुमार मुनोत, ईशा मुठे, श्रुती साठे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. आनंद गोखलेंनी सिनेमाचे लेखन केले आहे, तसेच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. २ ऑक्टोबर २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.