Aamne Saamne Marathi Natak : ‘आमने सामने’ या नाटकातून रिप्लेस केल्यामुळे अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर निर्माते मंगेश कदम आणि लीन भागवत यांनीही ‘नाण्याची दुसरी बाजू’ अशा आशयाचा व्हिडीओ शेअर करत तिसऱ्यांदा मानधन वाढवून देण्याची मागणी कलाकारांकडून करण्यात आली होती असं म्हटलं. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना आता रोहन आणि केतकीने पुन्हा एकदा खंत व्यक्त करत काही मुद्दे निर्मात्यांनी जाणून सांगितले नाहीत असं म्हटलं आहे. तसेच निर्मात्यांचा मेसेजही वाचून दाखवला आहे. इथून पुढे “आमच्या बाजूने पूर्णविराम…” एकंदर या विषयावर इथून पुढे ते काहीच बोलणार नाहीयेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रोहन-केतकी म्हणाले, “आम्ही आमच्या निर्मात्यांचा व्हिडीओ पाहिला, त्याखाली आलेल्या कमेंट्स वाचल्या. त्यांची नाण्याची दुसरी बाजू आम्ही ऐकली. पण, ती बाजू मांडत असताना अनावधानाने, चुकून किंवा सोयीस्कररित्या, मुद्दामून काही मुद्दे आले नाहीत म्हणून आम्ही हा व्हिडीओ शेअर करतोय. पण, या व्हिडीओनंतर आम्हाला या मुद्द्यावर कोणतीही चर्चा करण्याची इच्छा नाही. आमच्या निर्मात्यांनी तिसरी मानधन वाढ हे जितक्या ठाशीवपणे सांगितलं…तेवढ्याच ठामपणे त्यांनी हे नाही सांगितलं की, आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ…आता असा समज झाला आहे की, आम्ही एका वर्षात तीनवेळा पैसे वाढवून मागितले. पण, तसं नाहीये. आठ वर्षांत तिसरी मानधनवाढ म्हणजे आपण सरासरी जरी पाहिलं तरी अडीच ते पावणे तीन वर्षांत तिसरी मानधनवाढ असा याचा अर्थ होतो.”

निर्मात्यांचा मेसेज वाचून दाखवला…

“पहिली मानधनवाढ आमजी जी झाली होती ती चार वर्षांनंतर…जी अत्यंत किरकोळ होती, हे स्वत: निर्मात्यांनी मान्य केलं आहे. दुसरी मानधनवाढ झाली…सहा वर्षांनी, त्यामध्ये एकदा आमचं नाटक बंद पडलं होतं, ते परत नव्याने सुरू झालं. मग, हाऊसफुल्ल प्रयोग सुरू झाले…त्यानंतरच आम्ही मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. आमच्याकडेही मेसेज आहेत…ते व्हिडीओमध्ये बोलले की, त्यांच्या मागण्या आम्ही सहज मान्य केल्या. हे चुकीचं आहे. मी त्यांचं मेसेजमधील एक वाक्य वाचून दाखवते… ‘निर्माता म्हणून स्वत:ला मुरड घालून मी ही वाढ करीत आहे असो!’ म्हणजे ही मानधनवाढ सुद्धा त्यांनी मनापासून केलीच नव्हती… आणि तिसरी मानधनवाढ जी आम्ही वर्षभरानंतर आता मागत होतो.”

रोहन-केतकी पुढे म्हणाले, “या सात वर्षांत आमचे निर्माते स्वत:हून कधीच असं बोलले नाहीत की, आपलं नाटक आता छान सुरूये. बुकिंग चांगलंय, हाऊसफुल्ल होतंय…तर आपण तुमचे पैसे वाढवूयात असं कधीही म्हणाले नाहीत. बरं जेव्हा आता आम्ही पैसे वाढवून मागितले तेव्हा असंही म्हटलं की, जर आता नाटकाचं बूकिंग उतरलं तर आम्ही पाकिटाचा फेरविचार करू. म्हणजे प्रतिसाद नसेल तर कमी पाकिटातही आम्ही हे नाटक करायला तयार होतो पण, आम्हाला त्यात शेवटपर्यंत काम करायचं होतं.”

वाईट पद्धतीने आम्हाला बाजूला केलं…

“लॉकडाऊनमध्ये जेव्हा ५० टक्के प्रेक्षक क्षमतेवर प्रयोग सुरू होते…तेव्हा निर्मात्यांनी विनंती केली होती की, प्रेक्षक ५० टक्के येत आहेत तर आम्ही पाकिटही ५० टक्के देऊ. तेव्हा सुद्धा आम्ही तयार झालो होतो. जर आम्ही गेली सात वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर काम करतोय, तर वाढवून मागितलेले १५०० तुम्हाला मोठे वाटतात. या दीड हजारांसाठी तुम्ही आम्हाला रिप्लेस करता ते पण एकदम तडकाफडकी…कुणतीही पूर्वकल्पना दिली नाही. मग, या गोष्टीचं आम्हाला वाईट का वाटू नये? खरंच इतकं मन लावून आम्ही काम केलं. ज्या लोकांबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहिलो आणि जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा आम्हाला वाईट पद्धतीने बाजूला करण्यात आलं.” असं सांगत रोहन-केतकी यांनी खंत व्यक्त केली आहे.