Aarti Solanki shares post for Sai Tamhankar: सई ताम्हणकर नुकतीच ‘अडकित्ता’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी ५ मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर व सखी गोखले महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘अडकित्ता’ पाहिल्यानंतर आरती सोळंकीची सई ताम्हणकरसाठी खास पोस्ट
आता सईची ‘अडकित्ता’ वेब सीरिजमधील भूमिका पाहिल्यानंतर अभिनेत्री आरती सोळंकीने एक पोस्ट शेअर केली आहे. आरतीने तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत लिहिले, “‘अडकित्ता’ हा सिनेमा पाहिला आणि सई ताम्हणकरचा ‘फू बाई फू’पासूनचा प्रवास डोळ्यांसमोर आला. आपण तिने केलेल्या बोल्ड भूमिका ते अगदी सरळ साधी बाई, आयटम साँग, निवेदिका, हिंदी सिनेमे हे सगळं पाहिलं आहे. पण, मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत हे कळलं.”
पुढे तिने लिहिले, “आपल्याला कौतुक फक्त बॉलीवूडमधील हिरोईनचच आहे. त्यांना अभिनयातला अ जरी येत नसला तरी आपण त्यांना सुपरस्टार म्हणतो. पण, आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील मराठी हिरोईनची मात्र आपल्याला किंमत नाही.”
तिने असेही लिहिले, “आज मराठी इंडस्ट्रीमध्ये सई ताम्हणकर, प्रिया बापट, छाया कदम, अमृता खानविलकर या अशा अभिनेत्री आहेत, ज्या मराठी इंडस्ट्रीच नाही तर बॉलीवूड सिनेमे, वेब सीरिज, मराठी नाटकं यात मोलाचं काम करत आहेत. खूप वर्ष संघर्ष केल्यानंतर त्यांना हे मिळतंय. आपणसुद्धा प्रेक्षक म्हणून मन मोठं करूया आणि आपल्या मराठी हिरोईनना सुपरस्टार म्हणूया”, असे लिहित आरती सोळंकीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आरती सोळंकी कायमच तिची मतं परखडपणे व्यक्त करत असते. विविध विषयांवर ती मोकळेपणाने बोलते.
दरम्यान, सई ताम्हणकरने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ‘अडकित्ता’नंतर ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
