Aastad Kale father reaction on Son’s Viral Video : ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकात मराठी अभिनेता आस्ताद काळे काम करतोय. सांस्कृतिक कलादर्पण व्यावसायिक नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग सुरू होता. यादरम्यान, एक प्रेक्षक फोनवर जोरात बोलू लागला. यामुळे आस्ताद संतापला. “आम्ही तुमच्या जागी फोनवर बोलतो, तुम्ही इथे येऊन नाटक सादर करा”, असं तो नाटक थांबवून त्या प्रेक्षकाला म्हणाला. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आस्तादवर टीका होत आहे. आता आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनी मुलाबद्दल बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
प्रमोद काळे यांनी फेसबूकवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं…
“मी प्रमोद काळे, आस्ताद काळेचा बाप. त्याच्या संदर्भातला एक व्हिडीओ खूप व्हायरल झालाय आणि त्यावर अनेक प्रतिक्रियांचा पूर आलाय, त्यासंदर्भात ही मोठी पोस्ट :
मला माझ्या मुलाचा आणि त्याच्यात असलेल्या कलागुणांचा प्रचंड आणि रास्त अभिमान आहे. रास्त यासाठी, की आजही त्याच्या हातून काही चुकीचं घडलं, तर मी त्याला दोष देतोच.
पण हा जो व्हिडीओ व्हायरल झालाय, त्या घटनेबद्दल माझा आस्तादला पूर्ण पाठिंबा आहे.
मुळात कोणा एका चॅनलने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा प्रसिद्ध केला आहे. कोणाच्या परवानगीने त्यांनी हे कृत्य केलं? ते काय संपूर्ण नाटक शूट करत होते? नेमका हा भाग कसा काय कोणी शूट केला? आणि मग ती जी कोणी व्यक्ती नाटक चालू असताना मोबाईलवर स्पीकर ऑन ठेवून मोठ्याने बोलत होती, त्याचं शूटिंग का नाही केलं? कलाकार काय सार्वजनिक मालमत्ता समजता का तुम्ही? इन्स्टाग्रामवर टाकण्याआधी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती?
आता ज्या महाभागांच्या अत्यंत शिवराळ आणि अनाहूत प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याबद्दल :
एक माननीय लिहितात, हा फार माजोरडा आहे, स्वतःला काय नाना पाटेकर समजतो काय?
म्हणजे? नाना पाटेकर असं वागले असते, तर चाललं असतं? आणि नशीब, आस्ताद तसं काही समजत नाही! तिथे नाना असता, तर त्याने त्या प्रेक्षकांच्या मुस्कटात लगावून तो मोबाईल फेकून दिला असता!
आणखी एक दोघे म्हणतात तमाशा थिएटरात, झाडीपट्टीत हे सगळं चालतं, तर तिथले कलाकार कसं चालवून घेतात? ह्यांनाच काय प्रॉब्लेम आहे?
प्रत्येक ठिकाणची एक संस्कृती, काही रीतभात असते. आता आश्विनी भिडे किंवा कौशिकी चक्रवर्ती कितीही शृंगारिक ठुमरी गात असतील, तर तिथे कोणी श्रोता बोटं तोंडात घालून शिट्ट्या नाही मारत. आणि झाडीपट्टीविषयी तर काय बोलणार! पण संस्कृती…
‘ह्याला लई माज हाये’ अशी अनेकांची तक्रार आहे.
याला माज नाही, स्वतःचा आणि स्वतःतल्या कलावंताचा अभिमान व कलेबद्दलची निष्ठा म्हणतात. माज असेल, तर तो त्या फोनवर बिनदिक्कत मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीला. पाचशे रुपयांचं समजा तिकीट काढलं म्हणजे काय सगळं थिएटर, सगळे कलाकार विकत घेतले की काय? त्याच्या माजाबद्दल कोण बोलणार? आपण आसपासच्या आपल्याप्रमाणेच तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करत आहोत एवढीही समज नसावी? अशावेळी खरं तर इतर प्रेक्षकांनीच अशांना धडा शिकवला पाहिजे!पण आपण नको तेव्हा सहिष्णू गांधीवादी!
कित्येकांचं म्हणणं आहे, प्रेक्षक येतात, म्हणून तुमची नाटकं चालतात, तुम्ही त्यांच्यामुळे पैसे कमावता.
हे त्या जुन्या काळातल्या, प्रेक्षकांना मायबाप म्हणून डोक्यावर चढवणाऱ्या कलाकारांचं पाप आहे. इथे कोणीही प्रेक्षक नाट्य व्यवसाय चालावा, बिचाऱ्या नट नट्यांच्या घरच्या चुली पेटाव्या या महान उदार हेतूने नाटकाला येत नसतो. त्याचीही काही गरज असते, म्हणून तो येतो. तेव्हा यातली ही उपकाराची भावना मूर्खपणाची, मध्ययुगीन सरंजामशाहीची आहे.
आणखी एक तक्रार म्हणजे, नाटक संपल्यावर मेकअप रूम्समध्ये फोटो काढायला आलेल्यांशी हा उद्धटपणे वागतो.
बाबांनो, दोन अडीज तास एखादी गुंतागुंतीची भूमिका निभावून नेताना नट थकतात, भावनिक दृष्ट्याही ते दमतात. त्यांना काही वेळ तरी श्वास घेऊ द्याल की नाही? नाटक संपलं रे संपलं, की तुटून पडल्यासारखे येतात! आस्तादने कधीही, कोणालाहीबरोबर फोटो काढायला नकार दिल्याचं मी पाहिलेलं नाही. पण एखादे दिवशी प्रयोगानंतर तातडीने कुठे जायचं असू शकतं, काही इमर्जन्सी असू शकते हे ध्यानात घ्याल की नाही? त्याची आई शेवटच्या आजारात मरणाशी झगडत असतानाही तो प्रयोगाला जात होता, कारण प्रयोग रद्द करण्याने अनेकांचं नुकसान होत असतं. द शो मस्ट गो ऑन! बरं, हे लोक कुठेही येतात सेल्फ्या काढायला! स्मशानापासून मंगल कार्यालयापर्यंत आणि मॉलपासून भर रस्त्यापर्यंत व्हाया रेस्टोरंट्स, मंडई इत्यादी!
आणखी एक महत्त्वाची गोष्ट : तीनशे रुपये नाईट पासून आज पाच आकडी नाईटपर्यंत तो पोचलाय, ते त्याच्यातल्या सच्चा अभिनयाच्या जोरावरच. आस्तादला कोणी गॉड फादर, गॉड मदर नाही, आहे तो खणखणीत अभिनय, आणि आत्मविश्वास. त्याचं हे जग कोणाच्या कृपेवर चालत नाही. इथे प्रत्येक प्रयोगात स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. कमी पडलात, तर फेकले जाता तुम्ही दूर. तेव्हा टीका करताना अशी अनेक भानं जागी ठेवून ती करावी.
आपल्याकडे कला, कलाकार यांना आदर द्यायचा असतो, ते समाजातले महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्यामुळे आपलं जगणं सुंदर होत असतं हे कोणी लहानपणी सांगतच नाही, आणि त्यातून या अशा निर्बुद्ध, उद्दाम प्रतिक्रिया येतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जी लहानपणापासून बिंबवली गेलीच पाहिजे, ती म्हणजे सामाजिक जबाबदारी! पण ते असो. आडातच नसेल, तर…..
असो. पण या सगळ्यात कित्येकांनी आस्तादची पाठराखणही केली आहे, त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
त्याच्या सहव्यावसायिकांच्या खरं तर जोरदार प्रतिक्रिया यायला हव्यात, कारण हा काही कोणा एकट्याचा प्रश्न नव्हे. किंवा आल्याही असतील, किंवा येतीलही…. बघू!” अशी पोस्ट आस्ताद काळेच्या वडिलांनी केली आहे.
‘अगदी बरोबर केलं आस्तादने, दुर्दैवाने आपल्या कडील सुशिक्षित लोकांना नाटक, सिनेमा किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला जातांना मोबाईल बंद ठेवावे हे कळतच नाही,’ ‘कितीही सूचना दिली तरी हे होत नसेल तर यावर उत्तम पर्याय म्हणजे नाट्यगृहात जॅमर बसवणे. एकदोन तास विना फोन चालूच शकतं, नसेल चालत तर मग अशांनी बघूच नयेत नाटकं सिनेमे वगैरे,’ ‘इतरांचा रसभंग करण्यात कसला क्रूर आनंद मिळतो अशांना!’ ‘आस्तादचा संताप साहजिक आहे…त्याने योग्य तेच केले, सहमत आहे प्रमोद काका.. किती वेळा सांगितलं तरी पण फोन बंद करत नाहीत. मेसेजेसचे पिंग पिंग तर सतत चालू असते, आपण किती वेळा मागे चिडून बघितलं तरी ढिम्म,’ अशा कमेंट्स या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
