मराठी सिनेसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटांची लाट असून ‘अभया’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, यात अभिनेत्री योगिता भोसले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका स्त्रीची ही प्रभावी कथा आहे.
येत्या काळात अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये ‘अभया’ या आगामी चित्रपटाचाही समावेश आहे. मराठी कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट महिला केंद्रित आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटाचे हे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. पोस्टरमुळे सिनेप्रेमींमध्ये टीझर व ट्रेलरबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दमदार विषय आणि प्रभावी कथानकासह ‘अभया’ प्रेक्षकांना एक प्रभावशाली सिनेमॅटिक अनुभव देईल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन युसुफ सुरती यांनी केले आहे. या चित्रपटात योगिता भोसले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात मोहन जोशी, कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निकम यांसारखे मराठी कलाकार देखील झळकणार आहेत.
पाहा पोस्टर

‘अभया’ हा चित्रपट एका महिलेच्या प्रवासाभोवती फिरतो. तिचे धैर्य आणि निर्धाराची ही गोष्ट आहे. ही कथा तिची शक्ती, संघर्ष आणि सशक्तीकरण यावर भाष्य करते. हा चित्रपट प्रेक्षकांशी भावनिकरित्या जोडला जाईल.
पोस्टर रिलीज केल्यावर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे. निर्माते लवकरच चित्रपटाचा टीझर, संगीत आणि अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करणार आहेत. दरम्यान, दमदार विषय, प्रतिभावान कलाकार आणि मजबूत क्रिएटिव्ह टीममुळे ‘अभया’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ग्रेडियंट इन्फोटेनमेंट लिमिटेड व आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने अभया चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता ग्रेडियंट इन्फोटेनमेंट लिमिटेडने आता मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही पाऊल ठेवलं आहे. त्यांनी मीडिया, संस्कृती आणि मनोरंजन क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी 5,000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यामार्फत भारतातील कंटेट जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
