Abhijeet Khandkekar On friendship with Prarthana Behere: सध्या थिएटरमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच काही मराठी चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि येत्या काही दिवसांत इतर सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

यामध्ये ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुपर डुपर’ हा सिनेमा आहे; तर पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सखे गं साजणी’ हा सिनेमादेखील आहे.

आता हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतीच सखे गं साजणीच्या टीमने रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते मैत्रीबद्दल बोलले आहेत.

Award Banner

या मुलाखतीत त्यांना विचारले की, मैत्रीमध्ये कोणता नियम पाळायलाच हवा असे वाटते? त्यावर पूजा सावंत म्हणाली, “पारदर्शकता असायला हवी. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं, हे सांगणारा मित्र आयुष्यात असायला हवा.”

“मी प्रार्थनाबरोबर हक्काने…”

अभिजीत खांडकेकर म्हणाला, “मला मैत्रीत अमुक गोष्ट आवडते असं म्हणण्यापेक्षा माझ्या मैत्री अशाच आहेत. आपण कलाकारांच्या बाबतीत म्हणतो ना की एक स्वीच ऑन आणि स्वीच ऑफचं बटण असतं. ते एखाद्या भूमिकेत शिरतात, त्यानंतर त्यातून ते बाहेर येतात; तसं मित्रांच्या बाबतीतही असतं. म्हणजे काल ज्या मित्राबरोबर भांडण झालं आहे, ते विसरून तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र येता.”

प्रार्थनाबरोबरच्या मैत्रीबद्दल अभिजीत म्हणाला, “मी प्रार्थनाबरोबर हक्काने भांडतो, कारण- मला माहीत आहे की तो माझा हक्क आहे. तिला आवडेल न आवडेल, ते मी नंतर बघेन. मला जर त्या क्षणाला एखादी गोष्ट बोलावीशी वाटत असेल तर ते मी लपवणार नाही, त्यामुळे मैत्रीत जे रुसणं-फुगणं असतं ते मला आवडतं. मैत्रिणीनं माझ्यावर किंवा मी तिच्यावर चिडणं हा माझा हक्क आहे असं मला वाटतं. मित्रांवर आपला हक्क असणं मला आवडतं”, असे म्हणत अभिजीतने त्याला कशाप्रकारची मैत्री आवडते हे सांगितले.

‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये तीन व्यक्ती कशा एकमेकांच्या आयुष्यात येतात, त्यांच्यातील मैत्री, केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळाली. पुढे त्यांची मैत्री कोणते वळण घेणार, काय घडणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.