Abhijeet Khandkekar on Skin Issues: अभिजीत खांडेकर अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मालिका, सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अभिनेत्याने नुकतीच सोनाली खरेच्या वॉव विथ सोनाली या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या फिटनेस, डाएटबरोबर सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव, कठीण काळ अशा अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केले. त्याबरोबरच त्याने त्याच्या चेहऱ्यावरील डागांमुळे सिनेमा गमवावा लागल्याचेही सांगितले. तो नेमकं काय म्हणाला आहे, याबद्दल जाणून घेऊ…
‘या’ कारणांमुळे त्वचेची काळजी घ्यायला सुरुवात केली
अभिजीत खांडकेकर या मुलाखतीत म्हणाला, “त्वचेची काळजी घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण- माझ्या त्वचेवर कायम मुरमे यायची. माझ्या वयात येण्याच्या काळापासून ते कदाचित आतापर्यंत मला मुरमे येण्याची समस्या आहे. मी अगदी लहान वयापासून या समस्येचा सामना करतोय. असेही काही दिवस होते, जेव्हा दररोज चेहऱ्याला कुठलं ना कुठलं क्रीम लावल्यामुळे मला प्रेतासारखं झोपावं लागे. म्हणजेच स्थिर झोपावं लागत असे. त्यामुळे हे कारण आणि त्वचेबद्दलचान्यूनगंड यांतून मी त्वचेची काळजी घ्यायला सुरुवात केली.”
अभिनेता म्हणाला, “मी अभिनयाच्या क्षेत्रात फार नंतर आलो; पण मला काही पर्यायच नव्हता. मी व्यवस्थित रोज चेहरा धुतला नाही. अमुक क्रीम लावली नाही, तर माझा चेहरा अजून खराब होईल आणि आधीच खराब झालाय, काळी वर्तुळं येतील. काही गोष्टी आनुवांशिकही असतील, या सगळ्यामुळे मी स्वत:ची काळजी घ्यायला सुरुवात केली. आता आपण अशा क्षेत्रात आहोत की, बेसिक काळजी घ्यावी लागतेच. आपण स्वत:च आपल्या केसांची, त्वचेची आणि शरीराची काळजी घेतली पाहिजे. दुसरे कोणीच ते करणार नाही. दुसरे करतील, तर ते जज करतील किंवा अपमानच करतील आणि तसेसुद्धा अनुभव मला आले आहेत.”

“मला एक सिनेमा गमवावा लागला”, अभिजीत खांडकेकरने सांगितला अनुभव
पुढे तो म्हणाला, “माझ्या चेहऱ्यावरील मुरमांमुळे मला एक सिनेमा गमवावा लागला होता. एकानं मला सिनेमासाठी कास्ट केलं. ते मला अत्यंत अपमानास्पद पद्धतीनं म्हणाले की, त्याचं काहीतरी करून घ्या. मी त्यांना विचारलं की काय सर? तर ते मला म्हणाले की, तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत, त्याचं काहीतरी करून घ्या. मी म्हणालो की, तुम्ही मला जेव्हा सिनेमासाठी घेतलं, तेव्हा पाहिलंच आहे. तुम्हाला व्यवस्थित चेहरा असलेला लूक हवाय, हे मला समजू शकतं. पण, त्याला वेळ लागतो. मी आज प्लास्टिक सर्जरी करून घ्यायला गेलो, तर तीन महिने मला घरी बसावे लागेल. तर ते मी आता करू शकत नाही. तर तुम्ही दुसऱ्या हिरोला विचारू शकता, जो या कॅटागरीमध्ये बसत असेल.”
अभिजीत पुढे म्हणाला, “दरम्यानच्या काळात माझ्याच एका मित्राचा मला फोन आला की अमुक निर्माते आहेत, त्यांना तू ओळखतोस ना? तर मी हो म्हणालो. तो म्हणाला की, त्यांचा मला फोन आला होता. तर मी तुला हे विचारायला फोन केला आहे की, ते विश्वासू आहेत ना? तर त्यानं सिनेमाची गोष्ट एका ओळीत सांगितली, तर ती तीच होती, ज्यासाठी माझी निवड झाली होती. मी ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं, अमुक तारखेपासून शूटिंग सुरू होणार होतं, त्याचदरम्यान तो दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात होता. अर्थात, माझ्या मित्राचाही मोठेपणा आहे की, तो त्या सिनेमाला नाही म्हणाला. असे अनेक अनुभव मला आले.”

“सुखदाला तिच्या गोऱ्या रंगामुळे….”
सोनालीने त्याला विचारले की, या घटनेनंतर तुला नैराश्य आलं का, आपण या गोष्टींवर आधी काम करायला पाहिजे होतं, असं तुला वाटलं का? त्यावर अभिजीत म्हणाला, “या गोष्टी माझ्यासाठी संवेदनशील होत्या. कारण, आपलं दिसणं सगळं काही आपल्या हातात नसतं. आपण काही प्रमाणात त्या नियंत्रित करू शकतो. माणूस जन्माला येताना काही कमावलेली शरीरयष्टी घेऊन येत नाही, तो ती नंतर घडवतो. काही जण जाड असतात, काही कमकुवत असतात, काहींची त्वचा काळी असते, काही जण गोरे असतात. म्हणजे अनेकदा सुखदाला तिच्या गोऱ्या रंगामुळे ऐकावं लागलं. तिला पांढरी पाल म्हणून चिडवायचे. तर एखाद्या मुलीचं स्वप्न असेल की, मी इतकी गोरी दिसेन.”

तो असेही म्हणाला, “त्या-त्या काळात या गोष्टी समजणं अवघड असतं. तेव्हा असं वाटतं की, या गोष्टींमुळे मला चिडवलं जातं, मला नकार मिळतो. चेहऱ्यांवरील डागांमुळे एक मुलगी माझ्याकडे बघत नाही किंवा माझे मित्र सतत मला चिडवतात. तर त्या न्यूनगंडातून मी गेलो आहे. पण, मला लक्षात आलं की, मी जसा आहे, तसं मी स्वत:ला स्वीकारलं नाही; तर इतर कोणीही मी जसा आहे, तसं स्वीकारणार नाही. तर, मी स्वत:ला स्वीकारायला सुरुवात केली. मी माझ्या पद्धतीनं सुंदर आहे, आनंदी आहे. तर त्यासाठी आणि मी ज्या क्षेत्रात काम करतोय, त्याला जितकं गरजेचं आहे, तितकं मी केलं”, असे म्हणत अभिजीतने त्याला चेहऱ्यावरील डागांमुळे न्यूनगंड होता, तसेच, त्यामुळे नकारही मिळाला, असे सांगितले.
