Marathi Actor Abhinay Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या ९० च्या दशकातील सिनेमांना आजही तरुणपिढीचं तेवढंच प्रेम मिळतं. काही वर्षांपूर्वीच लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलाने म्हणजेच अभिनय बेर्डेने कलाविश्वात पदार्पण केलं. ‘ती सध्या काय करते’ हा अभिनयचा पहिलाच सिनेमा होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. यानंतर तो ‘मन कस्तुरी रे’, ‘अशी ही आशिकी’, ‘Boyz 4’, ‘दशावतार’, ‘उत्तर’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये झळकला. अभिनयने मोजक्याच पण दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अभिनय बेर्डेने “मी career मधून break घेतोय…” असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनय कॅप्शनमध्ये लिहितो, “मी करिअरमधून ब्रेक घेतोय…पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे…कारण जाणून घेण्यासाठी हा video शेवटपर्यंत बघा” अभिनयने व्हिडीओ शेअर करत यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. अभिनेत्याला स्वत:चा स्टार्टअप सुरू करायचा आहे. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतलाय.

“आज व्हिडीओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे आणि महत्त्वाचं आहे. मी माझ्या करिअरपासून जरा ब्रेक घ्यायचं असं ठरवलं आहे. हा ब्रेक यासाठी आहे कारण, मला माझं स्वत:चा स्टार्टअप सुरू करायचा आहे. त्यासाठी मला काही नव्या संकल्पना हव्या आहेत. त्यामुळे मला तुमची मदत लागणार आहे. जर, तुमच्याकडे Out Of The Box काही क्रेझी संकल्पना असतील तर, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा.” असं आवाहन अभिनयने त्याच्या चाहत्यांना केलं आहे.

अभिनय बेर्डेने या व्हिडीओला ‘प्लॉट ट्विस्ट’, ‘काहीतरी नवीन’ असे हॅशटॅग या पोस्टमध्ये दिले आहेत. त्यामुळे सध्या अभिनयच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्याच्या बहिणीने म्हणजेच स्वानंदी बर्डेने यावर लक्षवेधी कमेंट केली आहे, “ब्रो फक्त माझ्यामध्ये गुंतवणूक कर”

swanandi
स्वानंदी बेर्डेची कमेंट चर्चेत

आता अभिनय खरंच करिअरमधून ब्रेक घेतोय, की हाच त्याचा खऱ्या अर्थाने कमबॅक आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अनेकांनी अभिनयला कमेंट्समध्ये संकल्पना सांगण्यास सुरुवात केलीये. आता अभिनय खरंच ब्रेक घेणार की, हे फक्त त्याच्या आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन आहे…हे लवकरच सर्वांना समजेल.