Abhinay Berde Recalls Laxmikant Berde Memory : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही; तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. मुख्य नायकासह विनोदी भूमिकांमधून त्यांनी महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आजही टीव्हीवर त्यांचा कुठलाही सिनेमा लागला, तर त्यांची आठवण हमखास येत असते.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अपल्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी लक्ष्मीकांत यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणी किंवा काही किस्से शेअर करत असतात. अशातच त्यांचा मुलगा अभिनयनंही वडील लक्ष्मीकांत यांची पहिली आठवण शेअर केली आहे.
लक्ष्मीकांत यांचा जीवनप्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डेही अभिनय क्षेत्रात आला. त्याचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट बराच गाजला. त्यानंतर अनेक चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. अशातच त्याचा आगामी ‘उत्तर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने त्याने नुकत्याच एका मुलाखतीत वडिलांची पहिली आठवण शेअर केली आहे
‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनय आठवण सांगत म्हणाला, “वडिलांबद्दलची माझी पहिली आठवण आहे, ती स्टेजवरची. त्यांचं नाटक बघायचो. मी त्यांना स्टेजवर ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘लेले विरुद्ध लेले’, ‘सर आले धावून’, ‘टुरटुर’ यापैकी एक नाटक लाईव्ह करताना पाहिलं होतं. त्यामुळे माझ्या वडिलांबद्दलच्या बाकी आठवणी पुसट आहेत.”
अभिनय बेर्डे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर अभिनय म्हणाला, “मी सात वर्षांचा असताना बाबा गेले. पण मी त्यांना स्टेजवर बघितल्याचंच प्रकर्षाने आठवतं. त्यांना मी कॅमेऱ्यावर काम करण्याआधी किंवा स्क्रीनवर बघण्याआधी स्टेजवर अभिनय करताना बघितलं आहे. नाटक करताना बघितलं आहे. माझे वडील मला व्यवस्थित आठवत असतील, तर ते स्टेजवर परफॉर्म करतानाचेच आठवतात. ते स्टेजवर अगदी कहर करायचे.”
दरम्यान, अभिनय लवकरच क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ या आगामी चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनयसह हृता दुर्गुळेही पाहायला मिळणार आहेत.
