Ajinkya Deo Shares Memory With Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी कलाकारांशी एक खास नातं होतं. ते राजकारणात जितके सक्रिय होते, तितकंच त्यांचं कलेवरही प्रेम होतं हे आपण सर्वच जाणतो. उत्तम व्यंगचित्रकार असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना चित्रपटांचं नितांत वेड होतं. मराठी कलाकार आणि बाळासाहेबांच्या नात्याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलेत आणि वाचलेत. अशातच अजिंक्य देव यांनी त्यांची एक जुनी आठवण शेअर केली आहे.
अजिंक्य देव हे मराठी व हिंदी सिनेसृष्टीतले एक लोकप्रिय अभिनेते आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ते सुपुत्र. मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्वही सगळ्यांनाच भावतं. आजवर अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबरची एक जुनी आठवण सांगितली.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल विचारलं असता, अजिंक्य देव म्हणाले, “मला बाळासाहेबांचा खूप सहवास लाभला. कारण- आई-बाबांचं मातोश्रीवर कायम येणं-जाणं असायचं. बाळासाहेब ठाकरेंचंही आमच्या देव कुटुंबावर खूपच प्रेम होतं. मी तर लहानपणी त्यांच्या मांडीवर बसलो आहे.”
“बाळासाहेब ठाकरेंशी कुटुंबाशी खास नातं….”
पुढे अजिंक्य देव म्हणतात, “बाळासाहेब ठाकरे या नावाचं तेव्हा एक वेगळंच वलय होतं आणि ते वलय मी पाहिलेलं आहे. नंतर मी चित्रपटसृष्टीत गेल्यानंतरही अनेकदा त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. अनेकदा त्यांनी पाठीवर कौतुकाची थापही दिलेली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंशी माझं आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाशी खास नातं होतं.”
दरम्यान, अजिंक्य देव यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी मराठीत ‘माहेरची साडी’, ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘माझं घर माझा संसार’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी हिंदी सिनेमांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
अशातच अजिंक्य देव यांचा लवकरच ‘असा मी तशी मी’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात त्यांच्यासह अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. तसेच अजिंक्य देव यांच्या चाहत्यांना रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भूमिकेचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
