एकाच दिवशी दोन, तीन, तर कधी चार मराठी सिनेमे एकत्रित प्रदर्शित होतात. त्यावर निर्मात्यांनी संगनमत करून काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरून प्रत्येक मराठी सिनेमाला थिएटर मिळतील आणि प्रत्येक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकेल, अशी चर्चा अनेकदा झाली आहे. याचबद्दल आता अभिनेते अशोक शिंदे यांनीसुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अशोक शिंदे यांनी एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होत असल्याचा फटका सर्वच सिनेमांना बसत असल्याचं सांगितलं. याबद्दल बोलताना त्यांनी स्वत:च्या एका सिनेमाचं उदाहरण सुद्धा दिलं. तसंच याबद्दल मराठीत एकी नसल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. एकत्र सिनेमे रिलीज होण्याबाबत अशोक शिंदे नेमकं काय म्हणालेत? चला जाणून घेऊ…

मराठी मनोरंजन विश्व या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक शिंदे म्हणाले, “माफ करा. कुणी वैयक्तिक घेऊ नका. पण मराठीत ती एकी अजून नाही. एक उदाहरण देतो, एकीकडे संजय लीला भन्साली यांचा ‘पद्मावत’ आणि अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हे सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. तेव्हा भन्साली यांचा सिनेमा आधी रिलीज झाला आणि अक्षयचा नंतर एका आठवड्याने रिलीज झाला. त्यांनी ठरवून हा निर्णय घेतला की ‘पद्मावत’ आधी रिलीज व्हावा आणि ‘पॅडमॅन’ नंतर. एखाद्या सिनेमाचा विषय चांगला असेल, तर तो पुढच्या आठडव्यात पोहोचतोच. पण सुरुवातीचे जी कमाई असते, ती प्रत्येक सिनेमाला महत्त्वाची असते. वेगवेगळ्या आठवड्यात सिनेमे रिलीज झाल्याने सुरुवातीच्या कमाईचा फायदा त्या दोन्ही सिनेमांना झाला.”

पुढे ते म्हणाले, “असं माझ्या एका सिनेमाबाबत झालं होतं, लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर मी ‘लालबागची राणी’ सिनेमा केला होता, ज्याचे निर्माते होते बोनी कपूर. त्याचदिवशी पाच सिनेमे रिलीज होत असल्याचं बोनी कपूर यांनी मला फोन करून सांगितलं. त्यावर मी चित्रपट महामंडळांच्या अध्यक्षांना सांगून इतर पाच चित्रपटांच्या निर्मात्यांना भेटलो. ‘आपण एकेक आठवडा वाटून घेऊ’, असं मी त्यांना म्हटलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती की, ‘तुम्ही हिंदीवाल्यांना मदत का करताय?’ त्यावर मी म्हटलं, ‘अजिबातच नाही. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, भाषेचा मला अभिमान आहे. पण यात हिंदी-मराठी असं न करता आपण व्यवसाय म्हणून बघू. कारण यात सगळ्यांचेच पैसे गुंतले आहेत’. त्यावर दोन निर्माते म्हणाले की ‘आपण मराठी माणसं आहोत. आम्ही तारीख बदलणार नाही. कारण आमचा सिनेमा ‘शोले’ आहे. माझ्या सिनेमांबद्दल मला विश्वास आहे की ते चालणार.'”

यानंतर अशोक शिंदे म्हणाले, “शेवटी एका दिवशी पाच सिनेमे आलेच. त्यात दोन हिंदी असतातच, दोन दाक्षिणात्य सिनेमेसुद्धा, त्यात आणखी हॉलीवूड, आसामी, भोजपुरी आणि आता गुजरातीसुद्धा येत आहेत. सगळ्यांना वेळ वाटून दिल्यानंतर तेव्हा आम्हाला सकाळी ७, दुपारी ११, संध्याकाळी ४ आणि पुन्हा रात्री ११ असे शो मिळाले. यामुळे क्लेश सुरू होतात. हेच रिलीज जर एकेक आठवड्यांत केलं असतं, तर प्रेक्षकांकडेसुद्धा चॉइस असतो. त्यामुळे माझं मत आहे की, आपण विचार करून सिनेमे रिलीज करत नाहीत, तोपर्यंत मराठीत ‘बाहुबली’ होणारच नाही.”