मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी हे त्यांच्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण राजकीय-सामाजिक भूमिकेसाठी ओळखले जातात. अतुल कुलकर्णी कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नसले, तरी ते सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर सतत भाष्य करत असतात. राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत होती. या निवडणुकीत मुंबईतील २२७ जागांसह एकूण २,८६९ जागांसाठी मतदान झाले. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ (आज) सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत बहुतांश प्रभागांचे कल आणि निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत अंतिम निकाल जाहीर केले जातील. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अतुल कुलकर्णी यांनी मोजक्याच शब्दांची पोस्ट केली.

अतुल कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक मुद्द्यांवर त्यांची मतं मांडत असतात. आज महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी अनुक्रमे ६ राज्यांची नावे घेतली आहेत. या सर्व राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीही आता याच राज्यांसारखी झाली आहे, अशी पोस्ट अतुल कुलकर्णींनी केली आहे.

अतुल कुलकर्णी यांची पोस्ट नेमकी काय?

“हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र.” एवढंच अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

atul kulkarni post about election result
अतुल कुलकर्णींची पोस्ट (सौजन्य – फेसबूक)

मतदानाच्या दिवशी शाई पुसली जात असल्याच्या अनेक तक्रारी मुंबईसह इतर ठिकाणांहून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी यांनी एक कविता केली होती. ‘बोट म्हणे स्वच्छं झालं’, असं म्हणत त्यांनी केलेल्या मार्मिक कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्वच्छं बोट!
व्वा! हे मात्रं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छं झालं
मेमरी तशी शॉर्टंच असते
शाई उगाच डिवचत राहते
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छं झालं
कर्तव्याचा भार नको
अपेक्षांचं ओझं नको
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
आपण मोकळे तेही मोकळे
उद्या पासून जुनेच सापळे
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
प्रेशर दक्षतेचं नकोच घेऊया
नागरिक नको, लाभार्थी होऊया
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
मार्कर आता पाच वर्षं म्यान
सेवक, सेविका, मोकळं रान
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
-अतुल कुलकर्णी

ही कविता अतुल कुलकर्णी यांनी मतदानाच्या दिवशी शेअर केली होती.