मराठी अभिनेता कल्पेश समेळने अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. त्याने दिग्दर्शिका प्रतिक्षा खासनिसशी लग्नगाठ बांधली. २४ जानेवारी २०२६ रोजी कल्पेश व प्रतिक्षा लग्नबंधनात अडकले. प्रतिक्षा व कल्पेश दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कल्पेश समेळ व प्रतिक्षा खासनिस यांनी पारंपरिक पद्धतीने नाही, तर सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचं ठिकाण व सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कल्पेश व प्रतिक्षाच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीसाठी सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.

लग्नात प्रतिक्षाने राणी कलरची साडी नेसली होती. तिने फार कमी मेकअप केला होता. तर कल्पेशने पांढरा कुर्ता व त्यावर राणी कलरचं उपरणं घेतलं होतं. साध्या लूकमध्ये दोघेही खूप छान दिसत होते.

कल्पेश समेळने एक फोटो पोस्ट करून त्याच्या लग्नाबद्दल माहिती दिली. ‘आपण जेव्हा केव्हा लग्न करू तेव्हा आपण आपल्या कामाच्या जागेवर लग्न करूयात’ हे आम्ही अनेकदा एकमेकांना बोललो होतो!
तेव्हा ना जागा होती ना पुढचं काही माहीत होतं!
पण त्यानंतर आपण काम करत जातो आणि माणसं जोडत जातात तसं झालं आणि Earthian च्या माध्यमातून ही सगळी वेडी माणसं, आणि कामाची हक्काची जागा आयुष्यात आली!
आम्हाला आठवतंच नाहीये हे सगळं कसं घडत गेलं, आम्ही सगळे सोबत आलो आणि काम करायला लागलो
आणि आत्ता २ दिवसांपूर्वी आपल्या जागेवर, साधेपणानं, आपल्या प्रेमाच्या माणसांसमोर, कोणतेही विधी न करता, सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं! यात सगळी आपली माणसं हक्कानं कामं करत होती, सगळ्यांनी कमाल जागा सजवली होती. खूप इमोशनल क्षण होता हा!
अर्थियन ही जागा घडवणं ही खूप हळूहळू आणि कमाल प्रोसेस आहे आणि यात खूप वेडी लोकं आहेत!
निसर्गाला धरून काम करणारी माणसं आहेत. सगळ्या कलांसाठीची हक्काची ही जागा बनतेय
या जागेत लग्नाच्या निमित्ताने इतकी लोकं आली! तसेच तुम्हीपण येत रहा, इथे भरभरून प्रेम करणारी, हक्काचे कलाकार आहेत,” अशी पोस्ट कल्पेश समेळने केली आहे.

कल्पेश समेळची पोस्ट

कल्पेश व प्रतिक्षा दोघांनाही चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. ऋतुजा बागवेसह अनेक कलाकारांनी या दोघांचे वैवाहिक आयुष्यासाठी अभिनंदन केले आहे.