‘विठ्ठल माझा सोबती’, ‘रंगा पतंगा’, ‘अल्याड पल्याड’, ‘होय महाराजा’, ‘एक हजाराची नोट’, ‘आपडी थापडी’, ‘पोश्टर गर्ल’, ‘वाय’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘तथास्तु’, ‘दोन घडीचा डाव’, ‘डबल सीट’, ‘येड्यांची जत्रा’, ‘वन रूम किचन’, ‘नवरदेव बी एस्सी ॲग्री’, ‘मोगरा फुलला’, ‘श्वास’, ‘श्यामची आई’ अशा अनेक सिनेमांत अभिनेता संदीप पाठक महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. त्याच्या भूमिका कायमच लक्ष वेधून घेतात.

“जेव्हा पांडुरंग दिसतो तेव्हा संदीप पाठकला विठ्ठलाची मूर्ती दिसते, वारकऱ्याला विठ्ठल दिसतो”

अभिनेत्याने नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत संदीपने अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारल्या. तो मुळचा बीडचा आहे, तर तिथली काय व कशी परिस्थिती आहे; त्याचे बालपण, आवडते पदार्थ याबद्दलही त्याने सांगितले आहे. याबरोबरच तो वारकऱ्यांबद्दलही बोलला. तो म्हणाला, “आज माझ्याकडे फ्लॅट आहे, एसी, बंगला, गाडी, प्रसिद्धी आहे. पण वारकरी जो हसतोय, ज्याच्या खिशात १००-१५० रुपये आहेत, त्याचं हसू माझ्यापेक्षा भारी कसं काय आहे?

पुढे त्याने वारकऱ्याबरोबर झालेला संवाद कसा होता हेही सांगितले. तो वारकऱ्याला म्हणाला की, मामा २२ दिवस चालणार, पंढरपूरला मोठी रांग आहे. त्यावर वारकरी म्हणाला की मला माहीत आहे. तो म्हणाला, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला ३८ तास लागतात. त्यावर वारकरी म्हणाला, लागू देत, त्यात काय? अभंग, गवळणी, विठ्ठलाची गाणी गात ३८ तास जातील. त्यांना विचारले, काय मागणार विठ्ठलाकडे? यावर वारकरी म्हणाला की काही मागणार नाही. काय म्हणणार? काय म्हणायचं, मनुष्य जन्म दिला उपकार झाले, धन्य झालो, सगळ्यांना सुखात ठेव, मी काही मागत नाही. मग संदीपने विचारले की कशाला जायचं? त्यावर वारकरी म्हणाला की, पांडुरंगावर प्रेम आहे.

पुढे संदीप म्हणाला, “म्हणून मी म्हणतो की संदीप पाठक जो थेट दर्शन घेतो, त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही, काटे-कुटे, डांबराचे रस्ते तुडवत पंढरपूर गाठतो, ३८-४० तास उभा राहतो, पांडुरंग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत विठ्ठलाची गाणी गात असतो. जेव्हा पांडुरंग दिसतो तेव्हा संदीप पाठकला विठ्ठलाची मूर्ती दिसते, वारकऱ्याला विठ्ठल दिसतो.”

दरम्यान, संदीप पाठक नुकताच ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.