Siddharth Chandekar Rememers School Memories : माणूस मोठा झाला की, त्याला त्याचं बालपण नेहमीच आठवते. बालपणी मोठं व्हायची इच्छा असते आणि एकदा मोठं झालो की आठवतात ते बालपणीचे रम्य दिवस. आठवतात त्या शाळेच्या असंख्य आठवणी आणि मनात फक्त एकच इच्छा येते, ती म्हणजे पुन्हा लहान होण्याची… मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरलासुद्धा अशीच लहान व्हायची इच्छा होत आहे.
सिद्धार्थ चांदेकरला पुन्हा लहान व्हायची इच्छा वाटत असून ही इच्छा त्यानं काव्यात्मक पद्धतीनं व्यक्त केली आहे. नुसतं बालपणच नाही; तर त्यानं बालपणीच्या शाळेच्या आठवणीही काव्यात्मकरित्या व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यानं एक व्हिडीओ शेअर करीत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच त्यानं आपल्यालाही आपल्या बालपणाची सफर घडवून आणली आहे. काय म्हणालाय तो या व्हिडीओत चला पाहूया…
सिद्धार्थनं व्हिडीओमध्ये असं म्हटलंय…
परत लहान व्हावंसं वाटतंय का?
परत त्या खिडकी शेजारच्या बाकड्यावर बसावंसं वाटतंय का?
कर्कटकानं कोरलेल्या आपल्या ग्रुपचं नाव अजूनही असेल का?
फळ्याच्या मागे लपवलेलं Alpenliebe चं पाकीट अजूनही तिथेच असेल का?
पाव-पॅटिस वाल्याकडे राहिलेली पाच रुपयांची उधारी अजूनही त्याच्या लक्षात असेल?
घंटा बडवणाऱ्या बाळू मामांच्या खिशावर लागलेला शाईचा डाग अजूनही तसाच असेल?
माझ्या गणवेशाचं काय झालं असेल?
त्याचे तुकडे होऊन, पुन्हा त्याचा धागा होऊन, पुन्हा तो कुणी घालत असेल का?
२० मार्कांना येणारा दुसऱ्या महायुद्धाचं उत्तर मी ज्या वहीत लिहिलं,
ती पुन्हा कोरी करून त्यावर कोणी अक्षरं गिरवत असेल का?
मैदानावर हरवलेला आपला फ्रेंडशिप बँड कुणा नव्या दोस्तांना सापडला असेल?
टाकीच्या मागे लिहिलेलं माझं आणि तिचं नाव अजूनही ठळक असेल?
संधी मिळाली तर पुन्हा भूतकाळात जायला आवडेल का?
डब्यात नेलेली तूप-साखर पोळी पुन्हा मित्रांमध्ये वाटायला आवडेल का?
आणि नको झालेलं मोठेपण भिरकावून ‘हजर मॅडम’ म्हणायला आवडेल का?
सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केलेला व्हिडीओ
या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये त्यानं ‘शाळेत परत जायला आवडेल का?’ असंहीए विचारलं आहे. सिद्धार्थच्या या व्हिडीओवर कलाकार आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांच्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आदिनाथ कोठारे, क्षिती जोग, हेमंत ढोमेसह अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरचा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात त्याच्यासह अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, हरिष दुधाडे, सचिन खेडेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम, निर्मिती सावंत यांच्याही मुख्य भूमिका आहेत. येत्या १ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
