अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते उपेंद्र लिमये आता तितक्याच ताकदीच्या खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली असून, हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्याबरोबर सुरेन, मानसी नाईक, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेश सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनीत भोंडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचे कथा आणि पटकथालेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजीत मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
थॅलेसेमिया, गिल्बर्ड सिंड्रोम या आजारावर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दाम्पत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही तोंड देत असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात, पण त्या औषधाचा परिणाम नक्की कसा होतो. त्यानंतर वेगवेगळी वळणे घेत कथेत अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे नेमके काय होते, याचे उत्तर चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय करून मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘मन आतले मनातले’ चित्रपटातील त्यांची खलनायकी भूमिका हे चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे.

