Chhaya Kadam Kokan Video: बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने नाव कमावणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम होय. छाया कदम सध्या आपल्या मूळ गावी म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर येथे आहेत. २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘भूतम् भयम्’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहण्यासाठी छाया कदम यांनी कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट न घेता चक्क पावसात टेम्पोमध्ये बसून आपल्या गावाकडच्या मैत्रिणींच्या गँगबरोबर प्रवास केला. थिएटरमध्ये जाऊन मैत्रिणींबरोबर चित्रपट पाहतानाचे आणि मज्जा-मस्ती करतानाचे व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. छाया कदम यांचा कोकणातील हा साधेपणा पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
छाया कदम चित्रपटांचं शूटिंग नसेल तर धामापूरला जाऊन राहतात. गावाकडे गेल्यावर ते तिथले फोटो व व्हिडीओही शेअर करत असतात. सध्या त्या गावी असून गावातील मैत्रिणींबरोबर स्वतःचा चित्रपट पाहायला गेल्या. छाया कदम यांनी व्हिडीओमध्ये कोकणाची निसर्गरम्य झलकही दाखवली. छाया यांच्या मैत्रिणींनाही त्यांचा चित्रपट फार आवडला. व्हिडीओत त्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळतात.
छाया कदम यांची पोस्ट
“मी गावात आल्यावर पहिल्यांदाच थिएटरला सिनेमा बघायला गेले. तोही माझाच चित्रपट आणि माझ्या गावच्या गँगबरोबर. मजा मस्ती तर केलीच पण एक वेगळाच आनंद मला त्यादिवशी मिळाला. बाकी माझ्यावरचं प्रेम म्हणून सगळ्यांना चित्रपटातलं फक्त भूतच आवडलं,” असं कॅप्शन छाया कदम यांनी व्हिडीओंना दिलं आहे.

दरम्यान, छाया कदम यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तुम्ही खरोखर गाव जपताय, बरेचसे कलाकार फक्त नावापुरते एखाद्या मुलाखतीत गावाचा उल्लेख करतात तेवढंच, गावचं घरही त्यांना माहीत नसतं. पण तुम्ही अपवाद आहात,’ ‘छाया ताई भारीच काय, मज्जा करताय, काम केल्यानंतर रिफ्रेश होत असं जगायचं,’ ‘अगं हे किती छान आहे, मला हवी अशी गँग टेम्पोने फिरणारी, तू खूप खास आहेस आणि छान आयुष्य जगतेय,’ ‘हे सगळे किती नशिबवान आहे.. त्यांना साक्षात छाया कदमबरोबर सिनेमा बघायला मिळाला.. मला पण तुझ्या बरोबर बघायचाय,’ ‘खरा आनंदाचा क्षण,’ अशा कमेंट्स त्यांच्या या पोस्टवर पाहायला मिळतात.
