मैत्रीच्या नात्याची खास गोष्ट सांगणाऱ्या ‘मैत्रेया’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यापूर्वीच्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे रिव्हिल केलेले नव्हते. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमधून समर, आयुषी भावे, स्काय आणि रुची जाईल या चार प्रमुख कलाकारांचे चेहरे पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आले आहेत. या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला ऐकू येणाऱ्या म्युझिकमधील ‘मैत्रीच्या पल्याड हा मैत्रेया…’ हे शब्दही लक्ष वेधून घेत आहेत. या शब्दांमधूनच ‘मैत्रेया’ हा केवळ मैत्रीपुरता मर्यादित न राहाता, मैत्रीच्या पलीकडे जाऊन नात्यांमधील भावनिक गुंतागुंत उलगडणारा चित्रपट असल्याचे संकेत मिळतात. मैत्री, जवळीक आणि त्यापलीकडे असलेल्या भावनांचा प्रवास या चित्रपटातून कशा पद्धतीने उलगडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘काकण’ नंतर दिग्दर्शिका क्रांती रेडकर-वानखेडे पुन्हा एकदा नवी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ‘मैत्रेया’मधील कलाकारांचा लूक हा मॉडर्न आणि जेन झी पिढीला साजेसा असला, तरी या चित्रपटाची कथा आणि पार्श्वभूमी मध्यमवर्गीय मुळांना धरून बांधण्यात आली आहे. त्यामुळे मॉडर्न दिसणाऱ्या या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील नाती, भावना आणि अनुभव यांचा प्रवास प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे.
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर याबाबत म्हणते, “‘मैत्रेया’ या चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची या चौघांमधील नातं हा या कथेचा महत्त्वाचा भाग आहे. मैत्रीचं नातं जितकं सहज वाटतं, तितकंच त्यात अनेक भावना आणि अनुभव दडलेले असतात. ‘मैत्रेया’मधून याच नात्याचा एक वेगळा प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चारही कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना खूप सुंदर पद्धतीने साकारलं आहे. त्यांची ही गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “‘मैत्रेया’ हा केवळ तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून केलेला चित्रपट नाही. आजच्या पिढीच्या भावविश्वासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपलासा वाटेल, असा हा चित्रपट आहे. मनोरंजनासह नात्यांकडे पाहण्याचा एक सुंदर आणि सहज दृष्टीकोन या चित्रपटातून मांडला आहे. त्यामुळे ‘मैत्रेया’चा अनुभव तरुणांनीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन घ्यावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. मोठ्या पडद्यावर हा अनुभव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”
‘मैत्रेया’ या चित्रपटाचे सहनिर्माते अमन खळतकर आहेत. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
