Actress Kranti Redkar On Sachin Pilgaonkar Trolling : सोशल मीडियाद्वारे एखाद्या कलाकाराचे जितके कौतुक होताना दिसतं, तसंच एखाद्यावर टीका आणि ट्रोलिंगही होतं. त्यात कलाकारांच्या ट्रोलिंगचं प्रमाण वाढलं आहे. मराठी अभिनेते सचिन पिळगांवकरांनासुद्धा या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. याबद्दल अभिनेत्री क्रांती रेडकरनं तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर कुठल्याही मुद्द्यावरून ट्रोलिंग सुरू होतं. त्यात सॉफ्ट टार्गेट बनतात ती कलाकार मंडळी. गेल्या काही दिवसांत अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर त्यांच्या विविध वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. मुलाखतींमधील काही वक्तव्यावरून त्यांना प्रचंड ट्रोलिंगही सहन करावी लागली आहे. याचबद्दल क्रांती रेडकर व्यक्त झाली.
लोकशाही दिलेल्या मुलाखतीत क्रांतीनं सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगबद्दल म्हणाली, “सचिनजींच्या बाबतीत ट्रोलर्सनी मर्यादाच ओलांडली आहे. त्याचं खरंच वाईट वाटतं. त्या माणसाचं केवढं काम आहे. आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून ते काम करत आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. ट्रोलर्स आपली ओळख लपवतात, चेहरा दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलणार? बरं, या ट्रोलर्सना तरी त्यामागची सत्यता माहीत आहे का?”
यानंतर क्रांती म्हणाली “ते (सचिन पिळगांवकर) एखादी गोष्ट सांगत आहेत, तर ते खरं आहे की खोटं, हे ठरवणारे तुम्ही कोण? ते (सचिन पिळगांवकर) म्हणत असतील तर त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. समजा ते एखाद्या मोठ्या कलाकाराबद्दल तसं काही बोललेच नसतील, तर मग तो मोठा कलाकार येऊन असं काही झालंच नव्हतं हे म्हणणार नाही का? त्यांनी काहीतरी म्हटलंय म्हणजे नक्कीच काहीतरी असेलच ना? निदान त्यांचं ऐकातरी. तरीसुद्धा तुम्हाला त्याबद्दल काही म्हणायचंच असेलच तर बोलण्याची काही पद्धत तरी असावी. ट्रोलर्स अगदी काहीही बोलतात. मला ते नाही आवडत.”
सचिन पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ आणि असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी निर्माण केले आहेत.
