Mana Che Shlok Movie Controversy : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमाचे शोज देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे, उच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. या निर्णयानंतरही पुण्यात या सिनेमाचे दोन शो बंद पाडण्यात आले.

याविरोधात आता मराठी कलाकार एकत्र आले आहेत. अशाप्रकारे एखाद्या सिनेमाचं प्रदर्शन थांबवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही ‘मना’चे श्लोक या चित्रपटाच्या टीमच्या पाठिशी आहोत असं ठाम मत मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आहे. तर, मृण्मयी देशपांडेने या सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं असून, येत्या गुरुवारी १६ ऑक्टोबरला या सिनेमा नव्या नावासह प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या घटनेबाबत आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. “मना’चे श्लोक चित्रपटाचं प्रमोशन सुरू होतं यामुळेच किमान महिनाभर आधी या सिनेमाचं नाव सर्वांना माहीत असताना, सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिल्यानंतरही चित्रपटगृहात घुसून हा सिनेमा बंद पाडला गेला. आपण लोकशाही असलेल्या भारतात, अतिशय सुसंस्कारी विचारांच्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही. तीव्र निषेध!” अशी पोस्ट प्राजक्ता माळीने शेअर केली आहे.

Mana Che Shlok Movie
Mana Che Shlok Movie – प्राजक्ता माळीची पोस्ट

दरम्यान, ‘मना’चे श्लोक या सिनेमाच्या निमित्ताने मृण्मयी पहिल्यांदाच दिग्दर्शक व अभिनेत्री अशी दुहेरी जबाबदारी निभावताना दिसतेय. तिच्यासह या सिनेमात राहुल पेठे, सिद्धार्थ मेनन, करण परब या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा आता १६ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे.