मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. दरम्यान मध्यंतरी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोलही करण्यात आलं होते. नुकतचं एका मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या वाढलेल्या वजनावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला.
हेही वाचा- “तीन वर्ष मी…”; प्रार्थना बेहरेने सांगितलं लग्नानंतर चित्रपटात न दिसण्यामागचं कारण




प्रार्थना म्हणाली, लग्नानंतर मी ४५ दिवस हनिमूनला गेले होते. जाताना मी बारीक होते पण येताना माझं वजन खूप वाढलं होतं. त्यामुळे माझ्या नवऱ्याला वाटलं ही तीच प्रार्थना आहे ना जिच्याशी मी लग्न केलंय. मी कुठल्याच प्रकारे अभिनेत्री वाटतं नव्हते. मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हापण मला कधीच वाटलं नाही की मी खूप जाड आहे. अभिनेत्री म्हणून मला बारीक किंवा व्यवस्थित दिसायला हवं अस कधीच वाटलं नाही.”
प्रार्थना पुढे म्हणाली, “मी जशी होते तशी लोकांनी मला स्वीकारलं. मितवा, कॉफी आणि बरचं काहीमध्ये माझं वजन जास्त होतं. पण लोक मला म्हणायचे तू जाड असली तरी गोड दिसतेस. पण आता मला वाटतयं की ते खूप चूकीचं होतं. अभिनेत्री म्हणून तुम्ही दिसायला योग्यच हव्यात. त्यावेळेस मला हे लक्षात आलं नाही कारण मला गोष्टी आपोआप मिळत गेल्या. पण तीन वर्ष जेव्हा मला कोणतच काम मिळत नव्हत तेव्हा मला माझ्यातली कमतरता दिसू लागली.आणि त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न केले.”
दरम्यान, प्रार्थना बेहरे २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आता लवकरच प्रार्थना एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.