Actress Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. दोघेही कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहेत. २५ मे २००१ मध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणांशी लग्नगाठ बांधली आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. याच लग्नाला जाताना रेणुका यांच्या आईने त्यांना “अजूनही वेळ आहे हा…,” असं म्हटलं होतं. त्याबद्दल स्वत: रेणुका यांनी किस्सा सांगितला आहे.
रेणुका आणि आशुतोष राणा ही दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. तसेच ते त्यांच्या नात्याबद्दलही अनेकदा विविध माध्यमांमधून व्यक्त होताना दिसतात. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत रेणुका यांनी लग्नाच्या आधीचा एक किस्सा शेअर केला आहे. या मुलाखतीत रेणुका शहाणे नेमकं काय म्हणाल्या, चला जाणून घेऊ…
‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’शी साधलेल्या संवादात रेणुका शहाणे म्हणाल्या, “मी पहिल्यांदा सासरी गेले तेव्हा तिथे अनेक गोष्टी पहिल्यांदाच अनुभवल्या. तिथे कुणीही तुमच्या खोलीत येतं. लग्न झाल्यानंतरचे काही विधी वगैरे झाल्यानंतर आम्ही खोलीत सामान वगैरे बघत होतो. तर त्या खोलीत कोणीही येत होतं. मला त्याबद्दल तेव्हा कल्पना नव्हती.” तेव्हा मी राणाजींना विचारायचे, “हे कोण होते” त्यावर तेही म्हणायचे, “अरे, ते तिकडे राहतात वगैरे वगैरे…” त्यामुळे ते घरात येणारे जवळचेही नव्हते; पण ते आमच्या खोलीत यायचे, बसायचे आणि जायचे किंवा पेटीत काय आणलं आहे हेसुद्धा बिनधास्त बघायचे. सुरुवातीला मला याचा संकोच वाटायचा. याच्याशी कसं जुळवून घ्यायचं, असंही मला वाटायचं.”
त्यानंतर त्यांनी सांगितलं, “लग्नाच्या आधी मी तयार होत असतानासुद्धा अनेक जण त्या खोलीत येत-जात होते. तेव्हा माझ्या आईची प्रतिक्रिया जर पाहिली असती, तर त्यावर एक वेगळाच सिनेमा झाला असता. लग्नाला जाता जाताही एक किस्सा घडला होता. आम्ही लग्नासाठी आई-वडील, राणाजींचे मित्र असे सगळे एकत्रच जात होतो. तर तेव्हा गाडीत त्यांचे पूर्वीचे स्टुडंट पॉलिटिक्सचे वगैरे किस्से सुरू केले, ज्यात अगदी आक्रमकता वगैरे वाटत होती. म्हणजे आपण अगदी सिनेमांत वगैरे बघतो तसंच काही… राणाजींचे मित्र ते किस्से खूप आनंदाने ‘आमचे भैया, असे होते, तसे होते’ असं करून सांगत होते. त्यावर राणाजी माझ्याकडे बघतायत… मी आईकडे बघतेय आणि तेव्हा आई मला म्हणालेली, “अजूनही वेळ आहे हा…” त्यावर मीसुद्धा तिला म्हटलेलं, ” आता बाण सुटलाय…” दरम्यान, रेणुका यांनी हा किस्सा अगदी मजेत आईला हसत हसत सांगितला.
आजवर अनेक बॉलीवूड आणि मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या रेणुका या आता लवकरच उत्तर या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्यांनी एका आईची भूमिका साकारली आहे. त्यात त्यांच्यासह अभिनय बेर्डे, हृता दुर्गुळे मुख्य भूमिकांत आहेत. १२ डिसेंबरपासून हा सिनेमा रिलीज होणार आहे.
