गणेशोत्सव म्हटलं की आनंदाचे आणि उत्साहाचे सगळीकडे वातावरण पाहायला मिळते. विविध भाव असलेल्या गणपतीच्या मूर्त्या, ढोल-ताशांचा गजर, उत्तम देखावे यामुळे भक्तांच्या उत्साहाला सीमा राहत नाही. या सगळ्याला भक्ती गीतांची जोड असते.
आता अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायिका उत्तरा केळकर ‘पार्वती नंदना’ या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘आदित्य नायर प्रोडक्शन्स’ने हा अल्बम नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना गायिका उत्तरा केळकर, बालगायक आदित्य जी. नायर यांचा आवाज दिला आहे. प्रवीण कुंवर यांचे संगीत आहे. गुरु नायर प्रॉडक्शन्स या अल्बमचे निर्माते आहेत.
कोणत्याही कामाची सुरुवात गणेशाचे वंदन करूनच केली जाते. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये उत्साह पहायला मिळतो. हाच उत्साह आजी आणि नातवाच्या या गाण्यांमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या अल्बममध्ये ‘पार्वतीनंदना’, ‘एकदंत गजानना’, ‘दुर्वाहार तुझ्या गळ्यामधे शोभतो’, ‘तुझे कान भले मोठे’, ‘अन डोळे छोटे छोटे’, ‘कसा बाप्पा तू गोजिरा वाटतो’, ही गाणी पाहायला मिळत आहेत.
काय म्हणाल्या अभिनेत्री?
या गाण्यांबद्दल बोलताना वंदना गुप्ते यांनी म्हटले, “पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, काळ पुढे सरकत जातो, पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते; तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समाजवणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. हे गाणं करताना या सगळ्याचं समाधान जाणवलं.”
हेही वाचा: एका दिवसात कोकणात जाऊन परत मुंबई गाठणारी अभिनेत्री म्हणाली, “बाप्पा म्हणाला…”
कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यामुळे एक छान गाणं गायला मिळाल्याचा आनंद उत्तरा केळकर यांनी व्यक्त केला. चांगल्या टीमसोबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केला.