Adarsh Shinde received Maharashtra State Film Award: नुकताच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा मुंबईत झाला. या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्ती हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आदर्श शिंदे ठरला उत्कृष्ट पार्श्वगायक
लोकप्रिय गायक आदर्श शिंदेला या ६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याक्षणाचा व्हिडीओ आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की उत्कृष्ट गायक या श्रेणीत कोणी पुरस्कार पटकावला आहे, हे जाहीर केले जाते. लग्नकल्लोळ या सिनेमासाठी आदर्श शिंदेला हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे ऐकायला मिळते. आदर्शवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.त्यानंतर आदर्श पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर जातो.
उत्कर्ष शिंदेने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “अभिमानाचा क्षण, आनंदाचा क्षण आणि कृतज्ञतेचा क्षण. माझा भाऊ, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांना ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे.”
पुढे त्याने लिहिले, “हा सन्मान केवळ एका पुरस्काराचा नाही, तर संगीतावर, कलेवर आणि मेहनतीवर असलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाच्या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा, तंत्रज्ञाचा आणि संगीतप्रेमीचा हा सन्मान आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे, माननीय परीक्षक मंडळाचे आणि पुरस्कार सोहळ्याशी संबंधित प्रत्येक मान्यवराचे मनःपूर्वक आभार.”
शेवटी त्याने लिहिले, “‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक, कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे अथक मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.”
उत्कर्षच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आदर्श खूप अभिनंदन. हा खूप अभिमानाचा क्षण आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “एकच नंबर”, आणखी एकाने लिहिले, “खूप खूप अभिनंदन”, एकाने लिहिले, “अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, उत्कर्ष कायमच विविध फोटो, पोस्ट शेअर करत असतो. या माध्यमातून तो त्याच्या भावना व्यक्त करत असतो.
