Adinath Kothare-Urmilla Kanetkar Divorce Separation : लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र, इतके दिवस आदिनाथ अथवा उर्मिला या दोघांपैकी कोणीही यावर भाष्य केलं नव्हतं. या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या असून, अखेर आज इन्स्टाग्रामवर संयुक्तरित्या पोस्ट शेअर करत आदिनाथ-उर्मिलाने विभक्त होणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच या कठीण काळात सर्वांनी आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असला, तरीही लेक जिजाचं संगोपण ते एकत्र, पूर्ण जबाबदारीने करणार आहेत.

आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर… एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने आम्ही ( आदिनाथ म. कोठारे आणि उर्मिला कानेटकर ) पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.

गेल्या काही वर्षांत मीडियाने आणि चाहत्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.

म्हणूनच, आमच्या या खासगी प्रवासात… मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.

आदिनाथ आणि उर्मिला

गेल्या काही दिवसांपासून उर्मिला ही कोठारे कुटुंबातून विभक्त राहत असल्याची चर्चा सुरू होती. याशिवाय ती आदिनाथच्या ‘पाणी’ सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा गैरहजर होती. त्यामुळे या दोघांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या.

दरम्यान, ‘शुभमंगल सावधान’ सिनेमादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा महेश कोठारेंना भेटण्यासाठी उर्मिला त्यांच्या घरी गेली होती. नायिका म्हणून उर्मिलाचा तो पहिलाच चित्रपट होता आणि त्या चित्रपटात आदिनाथ सहाय्यक दिग्दर्शक होता. सेटवर दोघांची चांगलीच ओळख झाली. त्याचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं होतं. यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती आणि आता लग्नानंतर १५ वर्षांनी आदिनाथ-उर्मिलाने विभक्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या दोघांच्या मुलीचं नाव जिजा असून, ती आता ८ वर्षांची आहे.