Aditi Tatkare Post on Marathi Movie : १ जानेवारी २०२६ पासून हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच हा सिनेमा प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमानं अवघ्या चार दिवसांतच प्रेक्षक व समीक्षकांकडून कौतुक मिळवलं आहे. सर्वत्र सिनेमाचं कौतुक होतं आहे. अशातच आदिती तटकरेंनीसुद्धा सिनेमाबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, हल्लीच्या पिढीला इतर भाषांप्रमाणेच आपल्या मराठी भाषेचंसुद्धा महत्त्व समजायला हवं असा आशय असलेला हा सिनेमा सध्या कौतुकाचा विषय ठरतोय. सिनेमा पाहिलेले प्रेक्षक सोशल मीडियावर त्यांच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. सिनेमाची गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच मंत्री आदिती यांनी हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या सिनेमाबद्दलची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्या म्हणतात, ” ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी धडे देणारे नव्हे, तर आपल्याला माणूस म्हणून घडवणारे ज्ञानमंदिर आहे. आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देणारी व सद्य;स्थितीवर मार्मिक भाष्य करणारी अनोखी कलाकृती दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग यांनी आपल्यासाठी सादर केली आहे.”

पुढे त्या म्हणतात, “या चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासाची मी अगदी सुरुवातीपासून साक्षीदार आहे. अलिबाग येथे माझ्या हस्ते पार पडलेला चित्रपटाचा मुहूर्त सोहळा, नागाव, चौल-रेवदंडा, मुjरूड-जंजिरा या परिसरात चित्रीकरण झालेला हा चित्रपट माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे.” तसेच यापुढे त्यांनी सर्वांना आवाहन करीत “प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानं नावाजलेला हा चित्रपट मी आवर्जून पाहणार आहे, आपणही या कलाकृतीचा आवर्जून आनंद घ्यावा” असं म्हटलंय.

आदिती तटकरेंनी शेअर केलेली पोस्ट

या पोस्टखाली क्षिती आणि हेमंत यांनीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हेमंतनं आदिती तटकरेंबरोबर त्याचा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणतो, “खूप खूप धन्यवाद ताई! तुमच्याबरोबर हा चित्रपट बघायला आम्हीदेखील उत्सुक आहोत”. त्यावर आदिती यांनीही हात जोडत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, हेमंत ढोमेच्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’बद्दल सांगायचं झाल्यास, या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन त्यानं केलं आहे आणि क्षिती जोग या सिनेमाची निर्माती आहे. तसंच क्षितीनं या सिनेमात अभिनयदेखील केला आहे. क्षितीसह सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम व प्राजक्ता कोळी यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्राजक्ता कोळीनं या सिनेमामधून पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये काम केलं आहे.