Afratafri Official Trailer : एक कोटी रुपयांची रक्कम समोर आली की नात्यांमध्येही गणितं बदलू शकतात… आणि जेव्हा ही रक्कम तीन भावांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनते, तेव्हा गोंधळ होणारच! याच गोंधळाला आणखी रंगतदार वळण देणारा ‘अफरातफरी’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एक कोटी रुपये मिळणार की नाही? आणि या १ कोटींसाठी तीन भाऊ कोणती खेळी खेळणार, याची उत्सुकता ट्रेलरने निर्माण केली आहे.

ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या व्यक्तिरेखांमधील वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. एकीकडे एक कोटींची रक्कम मिळवण्याची धडपड, तर दुसरीकडे परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुरू असलेल्या युक्त्या आणि त्यातून निर्माण होणारे भन्नाट प्रसंग यामुळे ‘अफरातफरी’चा ट्रेलर खळखळून हसवतो. पैशांच्या हव्यासापायी तीन भावांमध्ये नेमकं काय घडतंय? याचा प्रवास सिनेमात पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तात्यांच्या मृत्यूमागचं खरं सत्य काय? एक कोटींची पॉलिसी खरंच तीन भावांच्या हाती लागणार का? पैशांसाठी सुरू झालेली धावपळ शेवटी कुठे जाऊन थांबणार? आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवणार? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ९ ऑक्टोबरला मिळणार आहेत. विनोद, गैरसमज, पैशांचा मोह आणि तीन भावांची धडपड यांची धमाल सांगड या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.या सगळ्या हास्याच्या आड एक कोटींची रक्कम नेमकी कुणाच्या पदरात पडणार? हा प्रश्न कायम राहतो.

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे याबद्दल म्हणाले, “टिझरमधून आम्ही ‘अफरातफरी’ची सुरुवात दाखवली होती, तर ट्रेलरमधून या गोंधळामागची खरी गंमत आणि पात्रांची धावपळ थोडी अधिक उलगडते. एक कोटी रुपयांची रक्कम ही या कथेतील प्रत्येकाच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येक पात्राला वाटतंय की आपला डाव बरोबर आहे, पण या सगळ्या डावपेचांचा शेवट नेमका कुठे होतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे एक कोडं म्हणून पाहावं, कारण पुढच्या क्षणी काय घडेल, याचा अंदाज लावणं तितकंच मजेदार आहे. या गोंधळात प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”