मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अजिंक्य देव. आजवर त्यांनी बऱ्याच गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. अजिंक्य देव हे रमेश व सीमा देव यांचे मोठे सुपुत्र आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आई-बाबा सुपरस्टार असूनही आमचं अतिशय साध्या वातावरणात संगोपन झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अजिंक्य देव नुकत्याच ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी सुरुवातीला कॅमेऱ्यापासून दूर पळायचो, मला भीती वाटायची. कॅमेऱ्यासमोर येऊन मी कधी अभिनय वगैरे करेन असा मी विचारच केला नव्हता. मी अभिनेता व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आई-बाबा जरी स्टार असले तरीही माझं आणि माझ्या भावाचं बालपण असं काही वेगळं नव्हतं. सामान्य कुटुंबात ज्याप्रकारे मुलांना वाढवलं जातं, त्याच पद्धतीने आमचंही संगोपन करण्यात आलं होतं. मराठीत म्हणतात, पाण्यात राहून पाण्याचा स्पर्श न होणं…अगदी तसंच आमचं बालपण होतं. आमच्या घरात कधीही पार्ट्या वगैरे झाल्या नाहीत. इंडस्ट्रीतले लोक कधीही आमच्या घरी यायचे नाहीत….खूप कमी लोक आमच्या घरी आले आहेत.”
अभिनेते पुढे म्हणाले, “आम्ही एकत्र कुटुंबात वाढलोय. आमच्या घरी माझी आजी, मामा, मावशी असे सगळेजण असायचे…आमचं घर खूप मोठं होतं. तेव्हा माझ्या बाबांचं ग्लॅमर, त्यांचं फॅन फॉलोइंग खूप होतं…लोकांचं बाबांवर खूप प्रेम होतं, त्यांना पाहण्यासाठी गर्दी व्हायची. अर्थात आईचाही एक वेगळा चाहतावर्ग होता. आम्ही आईबरोबर दादरमध्ये दिवाळीदरम्यान शॉपिंग वगैरे करायला जायचो. त्यावेळचा एक किस्सा सांगतो.”
“मी तेव्हा ५-७ वर्षांचा असेन आणि आईबरोबर आम्ही मी आणि माझा भाऊ दादरच्या रानडे रोडकडे गेलो होतो. भाजी, दिवाळीचं सामान, फटाके सगळं आई मार्केटला जाऊन स्वत: घ्यायची. त्यादिवशी मी आणि आई सायंकाळी ७:३० च्या दरम्याने रानडे रोडजवळ गेलो होतो. तेव्हा फोन वगैरे नव्हते…बाबांना माहिती होतं आई कुठे असेल, मग ते थेट रानडे रोडजवळ आले. बाबा जसे गाडीतून उतरले…तसा संपूर्ण रानडे रोड जाम झाला…सगळी वाहतूक कोंडी झाली होती. मी तेव्हा खरंच घाबरलो होतो कारण, माझे बाबा इतके लोकप्रिय आहेत…त्यांचा Aura या सगळ्या गोष्टी मला त्याआधी माहितीच नव्हत्या.”
“मी रमेश देव, सीमा देव यांचा मुलगा होतो म्हणून शाळेत मला विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सांगायचे. मी तर भाषण देताना दोन ओळी बोलून पळून जायचो अशी माझी अवस्था होती. पण, माझ्या वडिलांचं आधीपासून स्वप्न होतं की मी अभिनेता व्हावं…मी तर युएसला गेलो होतो. तिथून आल्यावर मग मी अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली.” असं अजिंक्य देव यांनी सांगितलं.
