गणेशोत्सवानिमित्त सध्या सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकारांच्या घरीसुद्धा गणपती विराजमान झाले आहेत. अशातच अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकतंच गणेश चतुर्थीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक कठीण प्रसंग सांगितला आहे. आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य देव यांनी गणपती बाप्पााच्या आशिर्वादामुळे त्या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यास मदत झाल्याचं यावेळी म्हटलं आहे.
गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार त्यांच्या आयुष्यातील गणपती बाप्पाचं स्थान, महत्त्व आणि अनुभव सांगत आहेत. अजिंक्य देव यांनाही याबद्दल विचारल्यानतंर त्यांच्या एका अपघाताचा प्रसंग सांगितला आणि गणपती बाप्पााप्रती असलेली श्रद्धा अधोरेखित केली. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत अजिंक्य यांना त्यांच्या आयुष्यात कधी कुठला चमत्कार घडलाय का असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, “चिक्कार घडलेत. मी आज उभा आहे ही त्यांचीच कृपा आहे का कारण- २००४ साली माझा एक खूप मोठा अपघात झाला होता.मी शुद्धीत नव्हतो. मला चार की तीन लोकांनी उचलून नेलं होतं. माझी बाइकही तिथेच होती. अपघात इतका गंभीर होता की कोणीही मला ओळखू शकलं नाही. आमच्या घराच्या जवळ वर्सोवा इथेच हा अपघात झालेला.”
अजिंक्य देव यांनी सांगितला अपघाताचा प्रसंग
अजिंक्य देव याबद्दल पुढे म्हणाले, “माझी मोठी बाइक होती. त्यामुळे आज मी आहे, बोलतोय पण तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं. मी पाच दिवसांसाठी कोमामध्ये होतो. पण त्यांची कृपा इतकी अचाट आहे की माझ्या डोक्यावर सहा टाके होते पण एकालाही काही झालं नाही. जर कुठली इजा झाली असती तर शस्त्रक्रिया करावी लागली असती. पण २०व्या दिवशी मी शूटिंग करत होतो. हा चमत्कारच आहे पण मी शब्दात सांगू शकत नाही. ज्या लोकांनी मला उचलून नेलं नंतर लोकांनी मला ओळखलं की अरे अंजिक्य देव आहे पण ते तिघे आजपर्यंत कधीही परत आले नाही की आम्ही तुम्हाला वाचलवं आहे वगैरे आणि तिघांचीही वेगळी नावं होती. तिन्ही वेगवेगळ्या धर्माची नावं होती. त्यामुळे हा चमत्कारच आहे पण तुमचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे.”
गणपतीवरच्या भक्तीबद्दल अजिंक्य देव म्हणाले, “आताच्या आपल्या सगळ्या पिढीची हीच समस्या आहे की आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो, मागतो पण आपल्याला असं वाटतं की आपली इच्छा खरंच पूर्ण होईल का पण ज्या क्षणी तुम्हाला शंका असते तेव्हा त्याची जादू संपते. त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवायला हवा.”
