Ajinkya Raut on Marriage: कलाकारांच्या लग्नाबद्दल, त्यांच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. जर कलाकारांनी त्यांच्या जोडीदाराबद्दल खुलासा केला नसेल, तर त्यांचा जोडीदार कोण आहे, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.

आता अभिनेता अजिंक्य राऊतने जोडीदाराबद्दल, कधी लग्न करणार याबद्दल वक्तव्य केले आहे. अजिंक्य राऊतने नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाबाबत वक्तव्य केले.

“लग्नासाठी मी तयार…”

अजिंक्य सुरुवातीला गमतीने म्हणाला, “अजिंक्यकडे भरमसाठ पैसे आले की अजिंक्य लग्न करेल.” पुढे तो म्हणाला, “आजच्या तारखेला ज्या प्रमाणात घटस्फोट वगैरे होत आहेत, ते पाहून तुम्हाला वाटतं का की मी असं पटकन लग्न करावं आणि लगेच सहा महिन्यामध्ये वेगळं व्हावं? त्यामुळे विचार करून लग्न केलेलं कधीही चांगलं आहे. अर्थात लग्नासाठी मी तयार आहेच. जर ते करायची वेळ आली तर मी करेन. पण, तशी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी”, असे म्हणत अभिनेत्याने लग्नाबद्दल वक्तव्य केलं.

अजिंक्य राऊत लवकरच अभंग तुकाराम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभंग तुकाराम चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. योगेश सोमण यांनी चित्रपटात संत तुकारामांची भूमिकादेखील साकारली आहे. अभिनेत्री स्मिता शेवाळे आवली या भूमिकेत आहे. अभंग तुकारामच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अजिंक्य राऊतच्या कामाबद्दल बोलायचे तर ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून अभिनेत्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळेदेखील प्रमुख भूमिकेत होती. या जोडीला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले.

अजिंक्य सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो, व्हिडीओ, तसेच त्याच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबद्दल तो मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतो. त्याच्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते.

दरम्यान, अजिंक्य अभंग तुकाराममधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.