Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते आज मुंबईहून बारामतीला जात होते. विमान लँड होत असताना हा अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

“महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्त्व”

अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “अजित दादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतात. तुम्ही खूप आवडायचा.”

Award Banner

पुढे त्यांनी लिहिले, “तुमची काम करण्याची पद्धत, तुमचा हजरजबाबीपणा तसेच तुमची सर्वसामान्य माणसांशी थेट त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टींमधे तुमचं असलेलं लक्ष हे सर्व आवडायचं. दादा, तुमची उणीव कायम भासत राहील. तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील. दादा तुम्ही कायम आठवत राहाल.”

सुबोध भावेच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

“तुम्हाला कधीच विसरू शकत नाही”

सुबोध भावेबरोबरच सुनील बर्वे यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले, “अजित दादा फारच चटका लावून गेलात.”

त्यांनी असेही लिहिले, “या नरसिंह किल्लेदार! क्वचित कधीतरी भेट व्हायची तेव्हा असं स्वागत करून कौतुक केलंत. तुम्हाला कधीच विसरू शकत नाही.”

“महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं आणि उठून दिसणारं होतं आणि कायम राहिल”

स्वप्नील जोशीने लिहिले, “आदरणीय अजित दादा, भावपूर्ण श्रद्धांजली.” पुढे त्याने भावना व्यक्त करत लिहिले, “महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं आणि उठून दिसणारं होतं आणि कायम राहिल. तुमचा साधेपणा, काम करण्याची तुमची तळमळ, मनाला भिडणारी होती.सामान्य माणसाशी त्यांना आपलं करून संवाद साधण्याचं तुमचं कसब खरोखरच दुर्मिळ होतं.”

अभिनेत्याने असेही लिहिले, “तुमची ऊर्जा आणि तुमचं व्यक्तिमत्त्व कायम प्रेरणा देत राहिल.”

दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असे म्हणले जात आहे.