Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Awards : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ दरवर्षी १४ जूनला हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ वाजता हा सोहळा मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात पार पडणार आहे. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी मनोरंजनविश्वातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या दोन्ही कलाकारांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. या सोहळ्यात मराठी रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञांचा देखील गौरव करण्यात येणार आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कारांमध्ये प्राजक्त देशमुखला सर्वोत्कृष्ट लेखक, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार अमेय दक्षिणदास याला ‘कुटुंब किर्रर्रतन’ नाटकासाठी प्रदान करण्यात येईल. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पर्ण पेठेला जाहीर झाला आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कार – विजेत्यांची यादी…
- सर्वोत्कृष्ट लेखक – प्राजक्त देशमुख (नाटक : करुणाष्टके)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अमेय दक्षिणदास (नाटक : कुटुंब किर्रर्रतन)
- सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – कुटुंब किर्रर्रतन ( संस्था : गौरी थिएटर्स)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – संकर्षण कऱ्हाडे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पर्ण पेठे (नाटक : करुणाष्टके)
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – आनंद इंगळे ( नाटक : एकदा पाहावं करुन)
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – चेतना भट (नाटक : भ्रमाचा भोपळा)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – वैभव रंधवे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – समिधा गुरु (नाटक : भूमिका)
- सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – ऋतुजा बोठे (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
- सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार – किशोर इंगळे (नाटक : कुटुंब किर्रर्रतन)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार – अजित परब (नाटक : बोलविता धनी)
- सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार – उल्लेश खंदारे (नाटक : भूमिका)
- सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक – बोलविता धनी
- सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता – ओंकार प्रभुघाटे (संगीत नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची)
- सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री – संपदा माने (संगीत नाटक : एकच प्याला)
प्रायोगिक नाट्य पुरस्कार – विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक – संगीत पद्माराणी
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – कर्ण
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक – आशुतोष वाघमारे (नाटक : दगडी भिंत)
- सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार – इरफान मुजावर (नाटक : युटोपिया)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आश्विनी आंचवले (नाटक : अय)
- प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक – अभिनेता अभिषेक काळे (नाटक : संगीत कट्यार काळजात घुसली)
- प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री – अनुष्का आपटे (नाटक : संगीत शाकुंतल)
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाट्य लेखक – दत्ता पाटील (नाटक : इथेच टाका तंबू)
दरम्यान, हा सोहळा नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांना आणि रसिकांना विनामूल्य असून काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. १४ जून रोजी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात हा सोहळा पार पडेल.
