Akshaya Gurav on Intimate Scene: ‘बिटरस्वीट’, ‘रानटी’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘श्यामची आई’, ‘फ्रेम, ‘फेकम फेक’, ‘आसान होता तो हर कोई किसान होता’ अशा अनेक मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांतून अभिनेत्री अक्षया गुरवने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.

आता मात्र अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अक्षयाने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयाने तिच्या व्यावसायिक, तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. तसेच, तिच्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दलही तिने मनमोकळेपणाने सांगितले. अक्षया गुरवने याच मुलाखतीत इंटिमेट सीनबद्दलही वक्तव्य केले. ती नेमकं काय म्हणाली आहे, याबद्दल जाणून घेऊ…

“मी माझ्या आयुष्यात एक….”

अक्षयाने रानटी या सिनेमाबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “रानटी हा चांगला सिनेमा मला मिळाला. त्यात मी नकारात्मक भूमिकेत दिसले आहे. मी स्विम सूट, बिकिनीमध्ये दिसली आहे. ‘बिटरस्वीट’मधील मुलगी ‘रानटी’ सिनेमात अगदी वेगळी दिसते, हे मीच आधी स्वीकारत नव्हते. समीत कक्करसरांनी माझं त्या भूमिकेसाठी कास्टिंग केलं आहे. त्यांनी मला सांगितलं की, तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्या पाहिजेत. तुला प्रत्येक वेळी आर्ट फिल्मच करायची आहे का? मग तेच करीत बस. मी त्यांना म्हणाले की, बिकिनी वगैरे घालणं मला ठीक वाटत नाही. ते म्हणाले की, ते तुझं काम आहे, ते तू केलं पाहिजेस. कशा पद्धतीनं शूटिंग करायचं ते माझं काम आहे. तू स्क्रिप्टसाठी काय गरजेचं आहे ते बघ. त्यामध्ये एक-दोन किसिंग सीनही आहेत. जेव्हा मी तो सिनेमा पाहिला, त्यावेळी मला वाटलं की, बरं झालं, मी सरांचं ऐकलं आणि मी माझ्या आयुष्यात एक वेगळा प्रयोग केला. मला असं वाटतं की, कलाकार म्हणून सगळ्या गोष्टींना तुम्ही तयार असायला हवं.”

इंटिमेट सीनसाठी होकार देण्याआधी आईची परवानगी घेतल्याचे सांगत अक्षया म्हणाली, “मला जेव्हा सरांचा फोन आला आणि मला गोष्टीबद्दल सांगितलं. तेव्हा माझं शरीर थंड पडलं होतं. आता एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाला मी नाही कसं म्हणू? मला काम तर करायचं आहे, चांगली संधी चालून आली आहे, असे विचार माझ्या डोक्यात येत होते. मी आईला फोन केला आणि तिला विचारलं की, आई मी काय करू? माझी आई मला म्हणाली की, मग ठीक आहे. तुझ्या सिनेमाची ती गरज आहे. तू कम्फर्टेबल आहेस का? तुला ठीक वाटत असेल, तर मी कन्फर्टेबल आहे. हे जेव्हा माझ्या आईकडून मला ऐकायला मिळालं, त्यावेळी मी ठरवलं की, आपण या सिनेमात काम करायचं.”

पुढे अक्षया म्हणाली, “त्या सिनेमानं मला खूप काही शिकवलं. मी खूप चांगल्या लोकांबरोबर काम केलं. शरद केळकर, संतोष जुवेकर, माझ्याबरोबर जो हीरो होता, तो हिंदीतील होता. समीतसरांबरोबर मला सतत काम करायचं आहे. सगळ्या चांगल्या लोकांबरोबर मी काम केलं. आता मला छान वाटतंय.”

दरम्यान, अक्षया गुरव सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.