‘अलबत्या-गलबत्या’ हे मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय बालनाट्य आता आणखी एका विश्वविक्रमाच्या दिशेने झेपावलं आहे. येत्या १५ ऑक्टोबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचे सलग ७ प्रयोग रंगणार आहेत. या अनोख्या उपक्रमातून पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील हजारो मुलांना आनंदाची अविस्मरणीय सफर घडणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सर्वस्य प्रोडक्शन आणि अद्वैत थिएटर यांच्या पुढाकाराने तसेच पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकारत आहे.
अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या-गलबत्या’ या नाटकाची सध्या हजाराव्या प्रयोगाकडे दमदार घोडदौड सुरू आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या जादुई लेखणीतून तब्बल पाच दशकांपूर्वी जन्माला आलेल्या ‘अलबत्या-गलबत्या’ची मोहिनी आजही कायम आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मनोरंजनाची माध्यमे बदलली; मात्र या नाटकाची लोकप्रियता आणि त्यातील जादू आजही तितकीच ताजी आहे.
या नाटकाने आतापर्यंत ३६५ दिवसांत ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम नोंदवला आहे. याशिवाय एका दिवसात सलग ४, ५ आणि ६ प्रयोग सादर करण्याचा विक्रमही या नाटकाच्या नावावर आहे. आता या नाटकाचे सलग ७ प्रयोग पार पडणार आहेत.
‘अलबत्या-गलबत्या’च्या लोकप्रियतेत नाटकातील गाण्यांचा मोठा वाटा आहे. रत्नाकर मतकरी, चिन्मय मांडलेकर, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी शब्दबद्ध केलेली गाणी… अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांनी आपल्या आवाजाने अधिक श्रवणीय आणि लोकप्रिय केली आहेत.
बालगंधर्व रंगमंदिरात १५ ऑक्टोबर रोजी ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग सादर करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा या टीमचा संकल्प आहे. या उपक्रमामागे केवळ विश्वविक्रमाची नोंद करण्याचा हेतू नसून, पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो मुलांना दर्जेदार नाट्याचा आनंद देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मानस आहे. सामूहिक प्रयत्न, हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि रंगभूमीवरील प्रेम यांच्या बळावर साकारला जाणारा हा आगळावेगळा सोहळा निश्चितच मराठी रंगभूमीच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे.
