Amey Khopkar Criticizes Digpal Lanjekar : “छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि ऐतिहासिक सिनेमा आहे म्हणून मी गप्प आहे”, असं म्हणत निर्माते अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकरांवर टीका केली. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या संगीत अनावरण सोहळ्यात अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकरांबद्दल हे विधान केलं.

एकाच दिवशी दोन, तीन, तर कधी चार मराठी सिनेमे एकत्रित प्रदर्शित होतात. त्यावर निर्मात्यांनी संगनमत करून काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरून प्रत्येक मराठी सिनेमाला थिएटर मिळतील आणि प्रत्येक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकेल, अशी चर्चा अनेकदा झाली आहे. याचबद्दल निर्माते अमेय खोपकर यांनी स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.

अमेय खोपकर यांची निर्मिती असलेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सिनेमा येत्या ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच दिवशी दिग्पाल लांजेकर यांचा ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा सिनेमासुद्धा रिलीज होणार आहे. त्याचा फटका साहजिकच दोन्ही सिनेमांना बसू शकतो. त्याचबद्दल ‘दिग्पाल लांजेकर यांच्याशी बोलणं झालं; पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही’, असं अमेय खोपकर म्हणाले. त्याशिवाय त्यांनी याचा निषेधसुद्धा केला आहे.

Award Banner

“इतरजण गप्प बसतात; मी गप्प बसणार नाही”

अमेय खोपकर म्हणाले, “मला एक गोष्ट सांगायची आहे, मी या गोष्टीचा निषेध करतोय. ही गोष्ट मला सांगायलाच पाहिजे. कारण- इतर निर्माते गप्प बसतात. मी गप्प बसणार नाही. मी बोलणार. विषय असा आहे की, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख मी इतर तीन सिनेमांसाठी पुढे ढकलली. इतर चित्रपट चालावेत, त्यांचा बिझनेस व्हावा, आपण नंतर येऊ, असा विचार करून मी माझ्या सिनेमाचं प्रदर्शन तीन आठवडे पुढे ढकललं. आता तीन-चार दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरनं त्याचा ऐतिहासिक सिनेमा येणार असल्याचं सांगितलं. तो सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी येणार होता. ही तारीखसुद्धा त्यानं सांगितली होती; पण त्याची तारीख त्यानं अचानक ३० जानेवारी केली. कुणाला विचारलंही नाही, कुणालाच सांगितलं नाही. काही नाही.”

“त्याने आतापर्यंत एकही कॉल उचलला नाही”

नंतर अमेय खोपकर म्हणाले, “याबद्दल मला कळलं, तेव्हा मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं, ‘माझ्या चित्रपटाची मी तारीख अगोदरच सांगितली आहे. तुम्ही हे करू नका, हे चुकीचं आहे.’ त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘ओह, अच्छा सॉरी. तुमचा सिनेमा आहे का? मला हेच कळलं नाही. तुमचा सिनेमा आहे का म्हणजे काय?’ त्यानंतर त्यानं मला सांगितलं की, ‘हे डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे.’ त्यावर मी म्हटलं, ‘डिस्ट्रीब्युटरचा यात काहीही संबंध नसतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्माता ठरवतो.’ मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही तुमच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदला. तुमचा सिनेमा मोठा आहे. तो चालला पाहिजे. तुम्हालासुद्धा थिएटर मिळाले पाहिजेत‘. इतकं बोलून मी त्याला “मला काय ते सांगा,‘ असं म्हटलं. त्यावर तो कॉल करतो, असं म्हणाला. पण, त्यानंतर त्यानं माझा आतापर्यंत एकही कॉल उचलला नाही. त्यानंतर मी विषय सोडून दिला; पण मी याचा निषेध करतो.”

“दिग्पाल लांजेकरने आगाऊपणा केला तर…”

पुढे ते सांगतात, “छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आहे, ऐतिहासिक सिनेमा आहे म्हणून मी गप्प आहे. एका दिवसात असे दोन-दोन, तीन-तीन सिनेमे येतात आणि आपण गप्प बसतो. यावर कुणी काही बोलत नाही. म्हणून काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवली पाहिजे. त्यांना बॅन करण्याची गरज आहे. दिग्पाल लांजेकरनं असाच आगाऊपणा केला. निर्माता संघ आणि महामंडळाला सांगावं लागेल की, त्याला बॅन करावं. का नाही बॅन करायचं? आमच्या सिनेमात दीडशे-दोनशे लोकांनी मेहनत केली आहे, त्यांची मेहनत फुकट जाणार? कलाकारांनीसुद्धा दिवस-रात्र मेहनत केली आहे. असो… मी फक्त याचा निषेध करतोय. त्यांनादेखील थिएटर मिळू दे आणि आम्हालासुद्धा थिएटर मिळू दे.”

दरम्यान, अमेय खोपकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अजून दिग्पाल यांची अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता ते यावर काय म्हणतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.