Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Movie : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक दमदार कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय क्रांतिज्योती सिनेमाला बॉक्स ऑफिसवर सुद्धा भरभरून यश मिळत आहे. या चित्रपटातील एक जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. आता ही जोडी सिनेमातील नायक-नायिकेची नसून बापलेकाची आहे.
लोकप्रिय अभिनेता अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘क्रांतिज्योती’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक भन्नाट BTS व्हिडीओ शेअर केला आहे. या सिनेमात अमेय वाघने साकारलेल्या भूमिकेचं नाव आहे बबन म्हात्रे, त्याला एक मुलगा असतो ज्याला तो प्रेमाने म्हणतो प्रिन्सुली. हा चिमुकला बबनला पापुली अशी हाक मारत असतो. अमेय वाघच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका या सिनेमात साईराज केंद्रेने साकारली आहे.
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यामुळे साईराज घराघरांत लोकप्रिय झाला होता. यानंतर तो ‘झी मराठी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सुद्धा झळकला. यानंतर साईराजला हेमंत ढोमेच्या सिनेमात झळकण्याची संधी मिळाली. क्रांतिज्योती सिनेमा प्रदर्शित होताच बबन अन् प्रिन्सुलीची जोडी सर्वत्र चर्चेत आली आहे.
अमेय या व्हिडीओमध्ये म्हणतो, “मी आणि प्रिन्स आम्ही दोघं गाडीमध्ये बसलोय.” यानंतर अमेय साईराजला त्याने या चित्रपटासाठी कशी ऑडिशन दिली होती, ते संवाद म्हणून दाखवायला सांगतो.
साईराज म्हणतो, “मी प्रिन्स म्हात्रे. हे माझे पप्पा बबन म्हात्रे आणि माझी मम्मी डॉली म्हात्रे. माझे पप्पा मला खूप आवडतात कारण, ते मला रोज पोहायला घेऊन जातात. मला ते अभ्यास सुद्धा करू देत नाहीत. ते माझे खूप लाड करतात आणि डॉली मला लय मारते.”
पुढे अमेय त्याला विचारतो, “तुझ्या पप्पांना सगळे का घाबरतात?” यावर प्रिन्सुली म्हणतो, “कारण त्यांचे डोळे मोठे-मोठे आहेत…एवढे मोठे!”
अमेय वाघने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सखी गोखलेने या व्हिडीओवर “प्रिन्स बेस्ट आहे” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी यावर, “बेस्ट जोडी प्रिन्सुली…बोल माझी पापुली एक नंबर जोडी”, “एकदम भारी”, “बबन-प्रिन्सुली जोडी कमाल”, “दोघेही मस्त…तुम्ही दोघांनी सिनेमात खूप हसवलं”, “Cutest व्हिडीओ मजा आली” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
