आशिष पाटील हा मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. ‘लावणीकिंग’ अशी ओळख असलेल्या आशिष पाटीलने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आशिषची खूप चांगली मैत्रीण आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘बाई गं’ गाण्यासाठी आशिष-अमृता या दोघांनीही खूप मेहनत घेतली होती.
आशिषने ‘आरपार ऑनलाइन’शी संवाद साधताना याविषयी सांगितलं आहे. तो म्हणाला, “मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोरिओग्राफर म्हणून एक उत्तम गाणं मिळायला मला १८ वर्षे लागली. ते गाणं होतं ‘बाई गं’! त्यावेळी अमृता खानविलकर माझ्यासाठी भांडली होती की, हे गाणं आशिष पाटीलने कोरिओग्राफ केलं पाहिजे. त्या गाण्यामुळे मला ‘हिरामंडी’च्या टीमबरोबर काम करण्याची संधी मिळाली.”
“‘बाई गं’ गाण्याच्या यशानंतरही मला मराठी सिनेमांमध्ये एक वर्ष काम नव्हतं. त्याच एका वर्षात मला ‘हिरामंडी’सारखा प्रोजेक्ट मिळाला. त्यामुळे मी नेहमीच असं समजतो की, जे होतं ते चांगल्यासाठी होतं.” असं आशिषने सांगितलं.
काही वर्षांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत आशिष अमृताबद्दल म्हणाला होता, “लॉकडाऊन सुरू असताना अमृताने मला लावणीच्या अदाकारी शिकव, असं सांगण्यासाठी फोन केला होता. पण, तेव्हा मला तिने ‘चंद्रमुखी’बाबत काहीच सांगितलं नव्हतं. आम्ही ऑनलाइन काही जुन्या लावण्यांची तयारी केली. त्यानंतर अमृताने मला एकदा फोन करून ‘बाई गं’ हे गाणं पाठवलं, तो ट्रॅक ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आलं…मी लगेच अमृताला कॉल केला तेव्हा मला तिने सांगितलं, मी ‘चंद्रमुखी’ करते आहे. पण, मला चित्रपटाचे दिग्दर्शक, गाण्याचे कम्पोझर कोणीच ठाऊक नव्हतं. त्यानंतर ‘बाई गं’ गाण्यावर मी व्हिडीओ करून अमृताला पाठवला.”
“व्हिडीओ पाहिल्यावर प्रसाद ओक म्हणाला होता, कमाल आशिष!…त्यानंतर आम्ही भेटलो त्याने मला सांगितलं की, ‘चंद्रमुखी’ सिनेमा नेमका कसा आहे? मी महिनाभर अमृताकडून याचा सराव करून घेतला. अमृताच्या घरी एक छोटा रिहर्सल हॉल आहे त्या ठिकाणी सगळे जण रिहर्सल पाहण्यासाठी आले होते. अमृताने या लावणीचं सादरीकरण केल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं होतं. तिच्याकडून प्रत्येक कलाकाराने एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे डेडिकेशन. ती प्रचंड मेहनती आणि डेडिकेटेड आहे. तिला ती काय करतेय हे माहिती असतं. ‘बाई गं’ गाण्याच्या वेळीही अमृता आधीच म्हणाली होती की, आशिष हे गाणे स्लो आहे पण हे गाणं लोक कायम लक्षात ठेवतील.”
