Amruta Khanvilkar Birthday Gift : महाराष्ट्राची ‘चंद्रमुखी’ म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानवलिकरचा २३ नोव्हेंबरला वाढदिवस असतो. अभिनेत्रीच्या वाढदिवसाला आता फक्त २ दिवस बाकी राहिले असताना तिला तिच्या लाडक्या मैत्रिणीने म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक खास गिफ्ट पाठवलं आहे. प्राजक्ता आणि अमृता या दोघीही गेली अनेक वर्षे खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. यंदाच्या वर्षी या दोघी एकत्र केदारनाथ यात्रेला सुद्धा गेल्या होत्या. आता अमृताच्या वाढदिवसासाठी प्राजक्ताने दोन दिवस आधीच खास गिफ्ट पाठवलं आहे. हे गिफ्ट नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

अमृताने आजवर मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. याशिवाय अभिनेत्री उत्तम नृत्यांगना देखील आहे. अमृताचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर, प्राजक्ता माळीने देखील कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता बिझनेसवुमन म्हणून देखील ओळखली जाते. ‘प्राजक्तराज’ या तिच्या दागिन्यांच्या ब्रँडला सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या ब्रँडमध्ये विविध दागिन्यांचे डिझाइन लॉन्च करत असते.

अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने तिला स्वत:च्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडचे दागिने गिफ्ट म्हणून दिले आहेत. अमृताने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याची झलक सर्वांना दाखवली आहे. तसेच प्राजक्ताचेही आभार मानले आहेत. अमृता म्हणते, “माझं Early बर्थडे गिफ्ट…हे पाठवलंय माझ्या लाडक्या प्राजूने…थँक्यू सो मच डार्लिंग! आय लव्ह यू…खूप प्रेम राणी!”

दरम्यान, प्राजक्ता माळी व अमृता खानविलकर या दोघीही नुकत्याच ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाच्या प्रीमियरसाठी एकत्र पोहोचल्या होत्या. यावेळी या दोघींनी रेड कार्पेटवर एकत्र उपस्थिती लावली होती. या दोघींच्या सुंदर मैत्रीचं, त्यांच्या बॉण्डिंगचं कायम सर्वत्र कौतुक करण्यात येतं.

दरम्यान, अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द ताज स्टोरी’ सिनेमात ती झळकली होती. याशिवाय प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची निवेदिता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. याचप्रमाणे यंदाच्या बहुतांश पुरस्कार सोहळ्यांमध्ये प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ सिनेमाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.