मराठी सिनेविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. तिने मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वीच अमृताने रंगभूमीवर तिचं पहिलं पाऊल ठेवलं. रंगभूमीवर काम करण्याचं तिचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न ‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने साकार झालं. अमृताचं रसिक प्रेक्षकांसह दिग्गजांकडून या पहिल्याच नाटकासाठी भरभरून कौतुक करण्यात आलं. पण, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अमृता खानविलकर ‘लग्नपंचमी’ नाटकातून आता लवकरच एक्झिट घेणार आहे.

अमृता नाटकाचा निरोप घेणार असली, तरीही एक निर्माती म्हणून ती यापुढेही या नाटकाची जबाबदारी पार पडणार आहे, असं वृत्त मुंबई टाइम्सने दिलं आहे. अवघ्या काही महिन्यांतच ‘लग्नपंचमी’ नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. मात्र, आता अमृता तिचा या नाटकातील प्रवास थांबवत आहे.

अमृता आता ‘श्री रामभूमि’ आणि ‘चिरंजीवी हनुमान’ या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र होणार आहे. त्यामुळे ती नाटकाचा निरोप घेतेय. अमृता याबाबत मुंबई टाइम्सशी संवाद साधताना म्हणाली, “नाटक करण्याचं माझं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं. स्वत:ला दिलेलं वचन पूर्ण करता आलं याचं समाधान आहे. रंगभूमीने मला प्रेम, आठवणी, आत्मविश्वास दिला. प्रेक्षकांबरोबर एक अतूट नातं तयार झालं. निपुण, मधुगंधा, स्वप्नील आणि सुनील अभ्यंकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच समृद्ध करणारा होता. प्रयोग हाऊसफुल्ल झाले…त्यामुळे आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार. मी कायम सर्वांची ऋणी असेल.”

आता ‘लग्नपंचमी’ नाटकात अमृताची रिप्लेसमेंट म्हणून अभिनेत्री विदुला चौगुलेची वर्णी लागली आहे. विदुला ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नुकताच तिची प्रमुख भूमिका असलेला ‘सुपर डुपर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये विदुलाने ललित प्रभाकरसह स्क्रीन शेअर केली होती.

दरम्यान, मयसभा निर्मित ‘लग्नपंचमी’ नाटक जानेवारी २०२६ मध्ये रंगभूमीवर आलं. अवघ्या काही महिन्यांतच या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. यातील अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या नाटकाचं लेखन मधुगंधा कुलकर्णीने केलं आहे. तर, या नाटकाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आहे. आता अमृताच्या एक्झिटनंतर प्रेक्षकांना यामध्ये विदुला चौगुले झळकताना दिसेल.