Amruta Khanvilkar Diet Secrets : मराठी कलाविश्वासह बॉलीवूड गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. चाहते तिला प्रेमाने ‘चंद्रमुखी’ असंही म्हणतात. अमृताचं स्वत:च्या फिटनेसवर खूपच लक्ष असतं. काय खायचं, काय नाही…योग किती वाजता करायचा, या सगळ्याच्या वेळा तिच्या ठरलेल्या असतात. पण, जे पदार्थ तिला मनापासून आवडतात ते अमृता महिन्यातून एकदा तरी खातेच.

अमृता खानविलकर ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत डाएटबद्दल म्हणाली, “आपल्या जिभेचे चोचले हे काही सेकंदाचे असतात. तेवढ्यापुरतं आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं आणि नंतर सगळं नॉर्मल होतं. त्यामुळे विशीतच मला समजलं होतं की, एक अभिनेत्री म्हणून काही गोष्टी, खाण्याच्या काही सवयी मला गिव्हअप कराव्या लागतील. आता मला चॉकलेट खाल्ल्याशिवाय अजिबात राहवत नाही. मला चॉकलेट्स खूप आवडतात…जेव्हा-जेव्हा मला मासिक पाळी येते तेव्हा मी दोन आईस्क्रीम तरी खातेच. मला पिझ्झा, पास्ता खूप जास्त आवडतो..महिन्यातून एकदा तरी हे पदार्थ खाते.”

“हल्ली मी नॉनव्हेज फार खात नाही…जवळपास सोडूनच दिलंय. कधीतरी मनात असेल तरच मी नॉनव्हेज पदार्थ खाते. मध्यंतरी मी नियमित योग करायचे तेव्हा मी दीड-दोन वर्ष अजिबात नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. मला अंडी खूप आवडतात…तर मध्ये-मध्ये मी ते खात असते. सांगायचा मुद्दा असा की, मी चॉकलेट ( डार्क चॉकलेट ) कधीही खाते, पिझ्झा-पास्ता महिन्यातून एकदा, Periods आले असतील दोन आईस्क्रीम हे सगळे पदार्थ मला खूप आवडतात. पण, या व्यतिरिक्त मी दाल-खिचडी खाणारी मुलगी आहे. आता काय होतं…कोणताही पदार्थ खाताना मला स्वत:ला ते जाणवतं की, अमृता हा पदार्थ तुझ्यासाठी योग्य नाहीये. आता ते माझ्या डोक्यात एकदम फिट झालंय…त्यामुळे मी जरा विचार करूनच खाते.” असं अमृताने सांगितलं.

८ ते १० वर्षांपूर्वी PCOD चं निदान झाल्यावर अमृताने हेल्थकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. आहारातून बरेच पदार्थ तिने पूर्णत: बंद केले आहेत. सूर्यास्तानंतर किंवा जास्तीत जास्त रात्री साडेआठनंतर ती काहीच खात नाही, ती फास्टिंग करते. मध्यंतरी नाटकाच्या प्रयोगांमुळे तिचं शेड्युल बदललं होतं. पण, यादरम्यान सुद्धा अमृता १२ तास फास्टिंग करायची.