Amruta Khanvilkar Divorce Rumors: मराठी आणि बॉलीवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. अमृता आणि हिमांशू वेगळे राहत असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन्ही कलाकारांनी आम्ही एकत्र आणि विवाहित असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, तरीही अफवा थांबत नसल्याने अखेर अमृता खानविलकरने अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे. तिच्या लीगल टीमने आता अफवा पसरवणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अमृता खानविलकरच्या कायदेशीर टीमने तिच्या अकाउंटवरून यासंदर्भात पोस्ट केल्या आहेत. अमृता खानविलकरबद्दल खोट्या, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनियतेचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात आहे, असं करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं या निवेदनात म्हटलंय.
अमृता खानविलकरची पोस्ट
अमृता खानविलकरच्या अकाउंटवरून इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत पोस्ट करण्यात आल्या आहेत.
अधिकृत कायदेशीर निवेदन, १० ऑगस्ट २०२६ पासून लागू… काही ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमृता खानविलकर आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीचा, मानहानीकारक आणि गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर पसरवला जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो, पण या स्वातंत्र्याचा गैरवापर करून अमृता खानविलकर यांच्याबद्दल मानहानीकारक विधान, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध, प्रसारित किंवा शेअर केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. उपलब्ध पुरावे मिळाल्यावर अशा प्रकारचा मजकूर तयार करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या, पसरवणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवलं जात आहे, त्याआधारे योग्य कायदेशीर कारवाईसाठी त्याची नोंदही केली जात आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमृता खानविलकरची मराठी पोस्ट
“अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्याबद्दल ऑनलाइन व सोशल मीडिया माध्यमांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनियतेच भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असं अमृता खानविलकरच्या कायदेशीर टीमने पोस्टमध्ये लिहिलंय. हे १० ऑगस्ट २०२६ पासून लागू असेल.
दरम्यान, अमृताने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं काही चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करून म्हटलं आहे.
