Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni : मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री कधीच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही असा समज अनेकांचा असतो. पण, इंडस्ट्रीत पूर्वापार असलेला हा समज अलीकडच्या काळातील काही अभिनेत्रींनी मोडून काढला आहे. बॉलीवूडपासून ते मराठी कलाविश्वापर्यंत अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्री आहेत ज्या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अशाच चार आघाडीच्या अभिनेत्रींनी नुकताच ‘फिल्मफेअरच्या राउंड टेबल’ चर्चासत्रात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी मैत्रीविषयी भाष्य केलं. प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या चौघी या मुलाखतीला उपस्थित होत्या.
इंडस्ट्रीत अनेकदा दोन अभिनेत्रींमधल्या वादाच्या किंवा वैरत्वाच्या फक्त चर्चा घडवून आणल्या जातात. खरंतर, प्रत्यक्षात असं काहीच नसतं. अशाच चर्चा सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघींबद्दल अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अखेर या दोघींनीही यावर मौन सोडलं आहे, आणि आमच्यात कधीच कोणतंही भांडण नव्हतं हे स्पष्ट केलं आहे.
सोनाली कुलकर्णी सांगते, “इंडस्ट्रीत सर्वात जास्त बोललं जायचं किंवा चर्चा होती ती म्हणजे…अमृता आणि माझ्यात असलेलं वैर…! पण, आज मी सांगते असं काहीच नव्हतं. बरं ही आमच्यात असलेल्या वादाची चर्चा कोणत्याही मीडियाने किंवा प्रसारमाध्यमांनी क्रिएट केली नव्हती. तेव्हा सोशल मीडिया इतकं जास्त कोणी वापरतही नव्हतं. याउलट, आमच्या दोघींमधलं वैरत्व हे इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी तयार केलं होतं. हे मी आज फार स्पष्टपणेच सांगते. कारण, आम्हा दोघींची अशी प्रत्यक्ष खरंच कधीही भांडणं झाली नव्हती किंवा वादही नव्हता.”
अमृता याबद्दल सांगते, “मी तुम्हाला एक किस्सा सांगते, मी आणि सोनाली एकदा एकत्र विमानप्रवास करत होतो. आम्ही दोघी एकमेकींच्या बाजूला बसलो होतो. कारण, आम्हाला त्याच जागा निवडून दिल्या होत्या. तेव्हा काही पुरुष अभिनेत्यांनी आमच्या दोघींचे एकत्र फोटो काढले होते. मी आता कोणाचं नाव घेणार नाही. पण, तेव्हापासून ही सगळी चर्चा सुरू झाली. आता पुढे काय होणार? या दोघी एकच रूम शेअर करणार का? एकाच रंगमंचावर परफॉर्म करणार का? आमच्या दोघींच्या मैत्रीबद्दल चर्चा सुरू झाली आणि सगळ्यांमध्ये आमच्या मैत्रीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.”
सोनाली पुढे म्हणाली, “यामागचं अजून एक कारण म्हणजे…आम्ही दोघींनी एकाच सिनेमात दोन वेगवेगळ्या गाजलेल्या गाण्यांवर सादरीकरण केलं होकं. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘नटरंग’. तेव्हापासून या वैरत्वाच्या चर्चा सुरू झाल्या… त्यामुळे आमच्यासाठीही हे विचित्र होतं…हे वादाचं चित्र मीडियाने नाही तर इंडस्ट्रीनेच तयार केलं होतं.”
दरम्यान, यापूर्वी सोनाली ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. इथेही तिला अमृताबरोबरच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सोनालीने आम्ही एकत्र काम केलं असतं, तर नक्कीच मैत्री झाली असती. आमच्यात वैरही नाहीये असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
