Amruta Khanvilkar : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतीच केदारनाथ व बद्रीनाथ यात्रा पूर्ण केली. अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अमृता या यात्रेला गेली होती. या यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो, व्हिडीओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मात्र, केदारनाथहून मुंबईला परतल्यावर अमृताची प्रकृती बिघडली आहे. सध्या ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. यामुळेच केदारनाथला जाण्यापूर्वी काय-काय काळजी घ्यावी याबद्दल अमृताने व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
अमृता म्हणाली, “हॅलो नमस्कार, मी काल केदारनाथवरून आले आणि आज आजारी पडल्यामुळे मला सलाईन लावावं लागलं. गेल्या २-३ दिवसांपासून मी प्रचंड आजारी पडले होते पण, मी तिथे डोलो गोळी घेऊन दिवस काढले. पण, आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की, केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ११,००० फूट उंचीवर आहे. ते खूप जास्त वरती आहे. त्यामुळे, या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “ट्रेक करून परत खाली येत असताना मला प्रचंड त्रास झाला. ते शेवटचे ४ किलोमीटर बापरे…असं झालं होतं की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आता मला बॉडीपेन वगैरे नाहीये पण, माऊंटेन सिकनेस अजूनही आहे. त्यामुळे केदारनाथला जाताना खूप काळजी घ्या, गोळ्या वगैरे घेऊन जा. ORS तुमच्याबरोबर ठेवा. अशक्त वाटलं की, ORS प्या, पाणी प्या…पण, प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका काळजी घ्या.”
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घाईगडबडीत ही ट्रिप करू नका. जर तुम्ही तिथे जात असाल तर, त्या वातावरणाशी जुळवून घ्या…एक दिवस तिथे राहा. दुसऱ्यादिवशी दर्शन घ्या…दर्शन घेतल्यावर सुद्धा एक दिवस शक्य असेल तर तिथे राहा, त्यानंतर खाली या. आमचं नशीब चांगलं होतं म्हणून ट्रेकदरम्यान पाऊस पडला नाही. कोणतीही दगदग झाली नाही. पण, वातावरणाचा त्रास होतो…एका पॉइंटला ते अशक्य होतं. प्रत्येकाचा या यात्रेदरम्यानचा अनुभव वेगवेगळा असेल…प्रत्येकाने तो सांगितला पाहिजे. आमची यात्रा सुंदर झाली पण, तेवढीच आमच्यासाठी आव्हानात्मक होती. ही यात्रा अजिबातच सोपी नाहीये.” असं अमृता खानविलकरने सांगितलं.