गेले काही दिवस गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण अगदी जल्लोषात गणपती साजरे आहेत. अनेक जण एकमेंकांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. कलाकारही इतरांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहेत. तर काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकारांना त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
यंदाच्या गणेशोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, शाहरुख खान, रितेश, जिनिलीया देशमुख, जॅकी श्रॉफ, पंकज त्रिपाठी असे अनेक आघाडीचे अभिनेते दिग्दर्शक एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर काल त्यांनी मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना दर्शनासाठी निमंत्रण दिलं होतं. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याचा अनुभव शेअर केला आहे.
काल अमृता खानविलकर तिच्या आईबरोबर एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती निमित्त गेली होती. या वेळेचा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय होता. काल अमृताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आणि काही कलाकारांबरोबर काढलेले फोटो शेअर करत लिहिलं, “आज बाप्पाचं दर्शन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या वर्षा बंगल्यावर झालं… अतिशय आपुलकीने ते आणि त्यांचे कुटुंबीय सगळ्यांना भेटत होते… इतका मान दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद साहेब. अनेक मैत्रिणी भेटल्या…मस्त वाटलं. बाप्पा आपल्याला सोडून जाणार..! पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्यासाठी…गणपती बाप्पा मोरया!”
तर आता तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यावर कमेंट करत तिचे चाहते तिची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.