‘वाजले की बारा’ हे गाणं साधारण २०१० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘नटरंग’ सिनेमात ही लावणी अगदी सुरुवातीलाच पाहायला मिळते. अजय-अतुलचं संगीत, बेला शेंडेचा आवाज आणि अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स या सगळ्याचा उत्तम मेळ आपल्याला ‘वाजले की बारा’ या लावणीत पाहायला मिळाला आहे. आज १६ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. प्रत्येक समारंभात, अवॉर्ड शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. पण, तुम्हाला माहितीये का? या लावणीसाठी अमृताला किती मानधन मिळालं होतं?

मराठी कलाविश्वाची चंद्रमुखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता खानविलकरने नुकतीच व्हरायटी इंडियाला मुलाखत दिली यावेळी अभिनेत्रीला ‘वाजले की बारा’ या सदाबहार लावणीबद्दल विचारण्यात आलं.

किती रुपये मानधन मिळालं?

अमृता खानविलकर ‘वाजले की बारा’बद्दल सांगताना म्हणाली, “आम्ही हे गाणं दोन रात्रीत शूट केलं होतं…. हे गाणं तू करशील का? असं विचारण्यासाठी मला रात्री दहा वाजता फोन आला होता आणि मी सुद्धा त्यांना ‘हो’ म्हटलं होतं. मला या गाण्यासाठी तेव्हा ३० हजार रुपये मानधन मिळालं होतं. पण, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन… या गाण्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.”

Award Banner

“या गाण्याची क्रेझ इतकी आहे की, आयुष्यात पहिल्यांदा मी अशा ठिकाणी परफॉर्म केलं होतं…जिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती. बऱ्याच ठिकाणी मी ही लावणी सादर केली आहे. अनेक भागात लाइट वगैरे नसूनही लोक माझा ‘वाजले की बारा’ गाण्यावरचा डान्स पाहायला आले होते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हे गाणं गाजलं. अगदी १० दिवसांपूर्वी वगैरे Nucleya च्या कॉन्सर्टमध्ये सुद्धा ‘वाजले की बारा’ गाणं लागलं होतं. तर, सांगायचा मुद्दा हा की, या गाण्यामुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली, १० हजार लोकांसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळाली…एकंदर माझं संपूर्ण आयुष्य या ‘वाजले की बारा’ गाण्यामुळे बदललं.” अशा भावना अमृताने व्यक्त केल्या.

सगळी देवाची कृपा – अमृता खानविलकर

अमृता पुढे म्हणाली, “मी कोणताही डान्स परफॉर्मन्स सादर करताना नेहमी दिग्दर्शक आणि कोरिओग्राफरचं ऐकते. कारण, मी ट्रेन डान्सर नाहीये. अनेक लोक विचारतात तुझी एनर्जी कमाल आहे…ती कधीच कमी होत नाही. ही सगळी देवाची कृपा आहे, त्याचं वरदान आहे असं मी सांगेन.”