Amruta Subhash And Sandesh Kulkarni Love Story : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं वर्चस्व निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर अमृताने काम केलेलं आहे. आई ज्योती सुभाष यांच्यासह अनेक ज्येष्ठ कलाकारांकडून अमृताला अभिनयाचे धडे मिळाले आहेत. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी सुद्धा तेवढीच फिल्मी आहे. अमृताने वैयक्तिक आयुष्यात लोकप्रिय अभिनेते संदेश कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला आज २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अमृताने खास पोस्ट शेअर करत नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वयाच्या सतराव्या वर्षी अमृता संदेश यांच्या प्रेमात पडली होती. पहिल्या भेटीचं निमित्त ठरलं सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस. संदेश कुलकर्णी हे सोनालीचे सख्खे भाऊ. अमृता व सोनाली या दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी, दोघींना अभिनयाची आवड होती, त्यामुळे या दोघींचं एकमेकींच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. सोनालीच्या वाढदिवसानिमित्त अमृता तिच्या घरी गेली असता, त्याचवेळी तिने संदेश कुलकर्णींना पाहिलं. कुर्ता घालून, बाह्या दुमडून संदेश आरशात पाहत उभे होते. ते कुठेतरी जाण्याची तयारी करत होते. त्यांना पाहताच अमृता संदेश यांच्या प्रेमात पडली होती.

या पहिल्या भेटीनंतर अमृता व संदेश यांनी एकत्र ‘पार्टनर’ नावाचं नाटक केलं. या नाटकाचं दिग्दर्शन संदेश यांनी केलं होतं. ‘पार्टनर’मुळे दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. या नाटकानंतर वयाच्या साडे सतराव्या वर्षी अमृताने संदेश यांना थेट लग्नाची मागणीचं घातली. संदेश हे अमृतापेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. समजूतदार स्वभाव असल्यामुळे त्यांनी आधी तिला समजावलं. याबाबत अमृताने ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

“एकतर तू लहान आहेस आणि हे वय आता काम करायचं आहे. प्रेमाचा विचार करण्याचं हे वय नाही. त्याच्यामुळे तू एनएसडीला जा. आता तू लहान आहेस. समज, तिथे जर तुला दुसरा कोणी मुलगा आवडला. तर फक्त मला शब्द दिलाय म्हणून तू परत येऊ नकोस. तुला ३ वर्षांनी मनातून वाटलं ना तर परत ये, फक्त शब्द दिलाय म्हणून नाही. कारण तू लहान आहेस. हे आकर्षण असू शकतं. त्यामुळे तिथे तू तुझ्या कामाकडे लक्ष दे”.

कालांतराने संदेश यांनी अमृताला लग्नासाठी होकार दिला. मग दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. आज अमृता-संदेश यांच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २३ वर्षांत संदेश यांनी कायम अमृताला खंबीर साथ दिली आहे.