Anand Ingle on Sukanya and Sanjay Mone:’आंधळी कोशिंबीर’, ‘मंगलाष्टका रिटर्न्स’, टाईम बरा वाईट, अजब लग्नाची गजब गोष्ट, कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, आजचा दिवस माझा, दे धक्का, बालक-पालक, बँजो, पोश्टर गर्ल, अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर, सातारचा सलमान, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा अनेक सिनेमा व मालिकांतून अभिनेते आनंद इंगळे यांनी प्रेक्षकांचे मोरंजन केले आहे.

आनंद इंगळे यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता ते चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांनी एका मुलाखतीत संजय मोने व सुकन्या मोने यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. आनंद इंगळे नेमकं काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊ…

“मी मुंबईत संजय मोनेंच्या घरी राहतो…”

आनंद इंगळे यांनी मित्र म्हणे या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “मी मुंबईत संजय मोनेंच्या घरी राहतो. संजय मोने माझ्या मोठ्या भावासारखा आहे. आजच्या काळात कोण करतं हे? मुंबईत मी भाड्याने जागा घेऊन राहू शकतो. पण, त्यांनी मला हाकलून देईपर्यंत मी त्यांच्याकडे राहणार आहे. याच्यात प्रेम आहे. मला एकदा संजय मोने म्हणाला होता, ओ इंगळे इथे झोपायला खाट आहे, जेवायला ताट आहे.

पुढे ते म्हणाले, “या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. शनिवारी रात्री पार्टीला मित्र भेटायचे. मला तेव्हा परवडायचं नाही. तेव्हा ते माझ्याकडून फक्त १०० रुपये घ्यायचे. त्यांनी मला कधीही तू काही नको देऊस, असं सांगितलं नाही. म्हणून काहीतरी द्यायची सवय लावली. आज ते मी ते सगळं माझ्या ज्युनियर्ससाठी करतो. माझ्यासाठी हे कोणीतरी केलेलं आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे की, मी जेव्हा बरोबर असेन तेव्हा माझ्यापेक्षा लहान मुलांनी पैसे देण्यासाठी पाकिटात हात घालायची गरज नाही”, असे म्हणत आनंद इंगळे यांनी संजय मोने व सुकन्या मोने यांचे कौतुक केले.

मराठी नाटक, सिनेमा, मालिका या माध्यमांतून संजय मोने प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या भूमिकांना कायमच प्रेक्षकांची दाद मिळते. त्याबरोबरच सुकन्या मोनेदखील विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कधी प्रेमळ, कधी रागीट अशा त्यांच्या भूमिका कायमच लक्ष वेधून घेतात.